बोरिवली नॅशनल पार्कमधील 'भारत-भारती'ला मिळाले पालक; 'या' मंत्र्यांनी घेतले दत्तक

    31-Jan-2025
Total Views |

ashish shelar adopted lion pair


 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त गेल्या आठवड्यात गुजरातवरुन दाखल झालेल्या सिंहाच्या जोडीला राज्याचे तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले आहे (ashish shelar adopted lion pair). शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी शेलार यांनी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत सिंहाच्या जोडीला दत्तक घेतले (ashish shelar adopted lion pair). तसेच राष्ट्रीय उद्यानात बिबट सफारी सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. (ashish shelar adopted lion pair)

 


रविवारी दि. २६ जानेवारी रोजी गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयामधून राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी आणण्यात आली. ही जोडी तीन वर्षांची आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'मध्ये 'वन्यप्राणी दत्तक योजना' राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पिंजराबंद अधिवासातील म्हणजेच 'व्याघ्र-सिंह सफारी' व 'बिबट्या निवारा केंद्रा'तील प्राण्यांना दत्तक देण्यात येते. दत्तकत्वाचा कालावधी वर्षभराचा असतो. याकरिता राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून काही रक्कम आकारण्यात येते. यामध्ये दत्तक प्राण्याचा वर्षभराचा वैद्यकीय आणि उदरभरणाच्या खर्चाचा समावेश असतो. राष्ट्रीय उद्यानाच्या या योजनेमधील पालकांच्या यादीत आता अॅड. आशिष शेलार यांचा समावेश झाला आहे. त्यांनी उद्यानात नव्याने दाखल झालेल्या भारत आणि भारती या सिंहाच्या जोडीला दत्तक घेतले. प्रत्येकी तीन लाखाप्रमाणे सहा लाख रुपये अदा करुन शेलार यांनी वर्षभरासाठी या सिंहाचे पालकत्व स्विकारले आहे.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बेवारस अवस्थेत सापडलेले बिबट्यांचे बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आलेले आहेत. मात्र पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानात बिबट सफारी सुरू करण्याचे निर्देश शेलार यांनी उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांना दिले आहेत. यासाठी सुमारे तीस हेक्टर जागा लागणार असून ही जागा राष्ट्रीय उद्यानात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात २० लाख पर्यटक भेट देतात, जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन जी. मल्लिकार्जुन यांनी शेलारांसमोर सादरीकरण केले. यावर शेलार यांनी, बिबट सफारीसाठी लागणारा निधी वन खात्याकडून आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ, असे सांगितले. तसेच तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ही अधिकाऱ्यांना दिले.

 
४११ जणांना सुरक्षा कवच
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४०० वन मजूर असून ते उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तसेच वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत गस्तीचे काम करतात. यातील बहुसंख्य हे आदिवासी बांधव आहेत. तसेच वन्यप्राण्यांचा बचाव करणारी ११ जणांची रेस्कू टीम असून या सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्क येतो. मात्र, या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलेला नाही, ही बाब मंत्री आशिष शेलार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत निर्देश दिले आणि या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यास सांगितले. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही ही त्यांनी दिली.