साधारणपणे न्यायालय म्हटले की, कायद्याची एक सामान्यांना न समजणारी भाषा आलीच. त्यात न्यायमूर्ती म्हटले की, करारी आणि कायद्याला धरून सारे काही करणारी एक प्रतिमा समोर येते. मात्र,या प्रतिमांना छेद देण्याचे काम न्या. नरेंद्र चपळगांवकर यांनी केले. कायद्याप्रमाणेच साहित्यनिर्मितीतही त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे शनिवार दि. २५ जानेवारी रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
शाळेत असल्यापासून ते वकील झाल्यानंतर कुठेही गेलो आणि कुणाला पूर्ण नाव सांगितलं की, समोरच्या व्यक्तीकडून एक प्रश्न हमखास असायचा व असतोच; तो म्हणजे ‘मुंबई उच्च न्यायालयात जे न्यायमूर्ती होते, नरेंद्र चपळगांवकर, ते तुमचे कोण?’
माझे आजोबा पद्माकर चपळगांवकर बीडमध्ये वकील होते. त्यांचे चुलत भाऊ न्या. नरेंद्र चपळगांवकर. म्हणजे तेसुद्धा नात्याने माझे आजोबाच! खरे तर लहानपणापासून ते आजपर्यंत त्यांच्यासोबत माझा, वैयक्तिक असा संबंध आला नाही. कारण, माझा जन्म जरी संभाजीनगरचा असला, तरी वडिलांच्या नोकरीनिमित्त मी लहानपणीपासूनच पुण्यात आलो आणि सगळे शिक्षण तिथेच झाले. मी जेमतेम दहा-अकरा वर्षांचा असेन, तेव्हा माझे आजोबासुद्धा बीड सोडून पुण्यात स्थायिक झाले आणि न्या. चपळगांवकर संभाजीनगरमध्ये. त्यामुळे भेटी व्हायच्या त्या फक्त चपळगांवकर परिवारातल्या लग्नकार्य इत्यादींमध्येच, त्यासुद्धा अल्पकाळासाठीच.
पण, आईबाबा, आजोबा, इतर नातेवाईक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृत्तपत्रे, माध्यमे यांच्याकडून जे काही त्यांच्याबद्दल माहिती झाले, त्यावरून लक्षात आले की न्या. चपळगांवकर हे फक्त वकील आणि निवृत्त न्यायमूर्ती नसून, सामाजिक क्षेत्रात एक मोठे नाव आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व साहित्यिक, बुद्धिवादी, विचारवंत, इतिहासकार असे अष्टपैलू होते. संविधान, कायदा, इतिहास, साहित्यावरची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यातील बरीचशी पुस्तके, आज विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाचा भाग देखील आहेत.
अलीकडेच त्यांनी लिहिलेले ‘आठवणीतले दिवस’ हे पुस्तक वाचण्यात आले. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या बालपणीपासून ते महाविद्यालयीन जीवन व वकील ते न्यायमूर्ती या कारकिर्दीचे, आत्मकथनपर अनुभव लिहिले आहेत.
त्यांचे अजून एक गाजलेले पुस्तक म्हणजे, ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ.’ यामध्ये त्यांनी, स्वातंत्र्यपूर्व भारतात झालेले तीन न्यायमूर्ती न्या. काशीनाथ तेलंग, न्या. महादेव रानडे आणि न्या. नारायण चंदावरकर यांच्या कार्याबद्दल लिहिले आहे. या पुस्तकासाठी त्यांना ’भैरू रतन दमाणी’ हा पुरस्कारदेखील प्राप्त झाला. त्याचप्रमाणे त्यांनी ’कर्मयोगी संन्यासी’ हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रग्रंथ, तर ’कहाणी हैदराबाद लढ्याची’ हे मराठवाडा मुक्ती संग्रामावरचे पुस्तके लिहिले. ‘संस्थानी माणसं’ हे हैदराबाद संस्थानाचा इतिहास घडविणार्या व्यक्तींच्या शब्दचित्रांचे त्यांचे पुस्तकही वाचनीय असेच.
अशा प्रकारे त्यांनी विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन करून, महाराष्ट्राच्या साहित्यात मोलाची भर घातली. २०२३ साली, वर्धा येथे पार पडलेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले.
‘राजहंस’चा ‘श्री. ग. माजगावकर स्मृती’ हा वैचारिक लेखनासाठी पुरस्कार, ‘मराठवाडा साहित्य परिषदे’तर्फे जीवनगौरव पुरस्कार, ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ या संस्थेचा ‘दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार’ आणि ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’चा ‘राम शेवाळकर स्मृती पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार, मानसन्मान त्यांनी प्राप्त केले. हा सगळा तपशील विविध वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध आहेच. पण, माझ्या काही वैयक्तिक आठवणी ज्या इथे सांगाव्या वाटतात, त्या म्हणजे मी वकील झाल्यानंतरच्या.
अभियांत्रिकीमध्ये पदवी घेऊन, मग २०१९ मध्ये वकील झालो आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. माझ्या बाबांनी त्यांना फोनवरून सांगितले की, “मी वकिलीची सुरुवात करतोय.” तर न्या. चपळगांवकर यांनी माझ्यासोबत बोलून, मला वकिलीचे काही मोलाचे सल्ले दिले. त्यांनी दिलेले सल्ले, वकील म्हणून मला आजही कामाला येतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे, प्रकरणामध्ये जे निकाल दिले जातात, ते न्यायाधीशांचे मत असते म्हणून कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर वैयक्तिक टीका करायची नाही आणि जर अपील उपलब्ध असेल, तर ते केले पाहिजे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी नेहमीच बाबांसोबत बोलताना, माझ्याबद्दल आवर्जून चौकशी केली होती.
२०२४च्या दिवाळीमध्ये आईबाबांसोबत आम्ही त्यांची भेट घेतली. तिथे त्यांनी मला आणि पत्नी स्नेहाला, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रॅक्टिसबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की, वकिलीच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचतोस का? आणि पुस्तके संग्रही करतोस का? यामधून लक्षात येते की, अवांतर वाचनावर त्यांचा खूप भर होता. सगळ्यांनीच अवांतर वाचन करावे, असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्यासोबत झालेले माझे एकूण संभाषण हे घड्याळाच्या काट्यावरही मोजता येईल, इतकेच असेल. पण, त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा, आयुष्यभरासाठी पुरेल इतकी आहे. दिवाळीमध्ये झालेली त्यांच्यासोबतची ती भेट, शेवटची ठरली आणि दि. २५ जानेवारीच्या सकाळी त्यांच्या निधनाची बातमी कानावर आली.
त्यांच्या जाण्याने फक्त चपळगांवकर परिवारच नाही, तर कायदा, साहित्य आणि तर्कशुद्ध, विवेकवादी विचारसरणीमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
नरेंद्र चपळगांवकर यांचा अल्पपरिचय
नरेंद्र चपळगांवकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव होते. पण, त्यांचे पूर्वज बीड येथे स्थायिक झाले. दि. १४ जुलै १९३८ रोजी, बीडमध्येच त्यांचा जन्म झाला. बीडमध्ये शालेय आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. छत्रपती संभाजी नगरमध्येच त्यांनी ‘एलएलबी’चे शिक्षण पूर्ण केले. सोबतच मराठी विषयामध्ये, ‘एम.ए.’ची पदवीसुद्धा संपादन केली. शालेय जीवनात त्यांना लागलेली भाषेची गोडी, महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी वृद्धिंगत होत गेली. साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी त्यांचा, महाविद्यालयीन जीवनात संबंध आला आणि त्यांचे मार्गदर्शन चपळगांवकर यांना लाभले. लहानपणापासून असलेली वाचन आणि लिखाणाची आवड त्यांना, साहित्याकडे घेऊन आली. कायदा आणि भाषा या दोन्ही गोष्टींवर त्यांचे खूप प्रेम होते. न्यायमूर्ती म्हणून ‘कायद्याची भाषा’ ते जाणूनच होते, पण साहित्यिक म्हणूनही त्यांनी ‘भाषेला न्याय’ दिलेला आहे. त्यांचे लिखाण म्हणजे केवळ अभ्यासपर लेखन किंवा अनुभवांचे कथन नाही, तर प्रत्येक गोष्टीचे केलेले तार्किक विश्लेषणसुद्धा आहे. १९९९ साली न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतरही साहित्य क्षेत्रात ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सेवानिवृत्तीनंतरच्या दोन दशकात त्यांनी विपुल लेखन केले. इतिहासाचा खूप मोठा पट त्यांनी, त्यांच्या लेखणीतून वाचकांसमोर उलगडलेला आहे. त्यांच्या नावावर असलेली पुस्तकांची यादीही खूप मोठी आहे. साहित्यिक ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असा प्रवास करत त्यांनी, ९६व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. न्यायक्षेत्रात किचकट खटल्यांची गंभीर चिकित्सा करणार्या त्यांच्या लेखणीने, साहित्यक्षेत्रात साधे आणि लालित्यपूर्ण लिखाण करून अनेकांना अवाक् केले.
नरेंद्र चपळगावकर यांची ग्रंथसंपदा :
कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व
आठवणीतले दिवस
कायदा आणि माणूस
कहाणी हैदराबाद लढ्याची
तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
त्यांना समजून घेताना (ललित)
दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
नामदार गोखल्यांचं शहाणपण
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
राज्यघटनेचे अर्धशतक
विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन
संघर्ष आणि शहाणपण
समाज आणि संस्कृती
संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
सावलीचा शोध (सामाजिक)
हरवलेले स्नेहबंध
सिद्धार्थ चपळगावकर
(लेखक सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे वकील आहेत.)