मुंबई (विशेष प्रतिनिधी) - अलिबाग तालुक्यातील किहीम येथे उभारण्यात येणार डाॅ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्राचे काम रखडलेल्या अवस्थेतच आहे (salim ali education center. विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेनंतरही या केंद्राचे बांधकाम सुरू झालेले नाही (salim ali education center). गेल्या तीन वर्षांपासून या केंद्राचे बांधकाम सुरू आहे. (salim ali education center)
रायगड जिल्हा परिषद आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किहीम येथे डाॅ. सलीम अली यांच्या नावाने पक्षी अभ्यास केंद्र उभारले जात आहे. केंद्राच्या उभारणीनंतर याचे सर्व कामकाज 'बाॅम्बे नॅचरल हिस्टी सोसायटी' (बीएनएनएच) पाहणार आहे. किहीम येथे २००७ सालापासून बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हे अभ्यास केंद्र उभारण्यात येत आहे. या शाळेच्या दोन इमारती असून सात वर्गखोल्या आहेत. त्यापैकी तीन वर्ग खोल्या सुस्थितीत असून चार या नादुरुस्त आहेत. ही जाग अंदाजित ३० गुंठ्यांची आहे. २०२२ साली रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या केंद्राचे भूमीपूजन केले होते. तेव्हापासून या केंद्राचे काम कासवगतीनेच सुरू आहे.
सद्यपरिस्थितीत या केंद्राचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ६० टक्के पूर्ण केले आहे. मात्र, विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेनंतर हे बांधकाम बंद आहे. याविषयी अलिबाग वन विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, 'बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची असून ते पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई आम्ही करणार आहोत'. डाॅ. सलीम अली हे ज्येष्ठ पक्षी शास्त्रज्ञ असून ते भारतीय पक्षीशास्त्र अभ्यासाचे अर्ध्वयू आहेत. त्यांचा जन्म किहीममध्येच झाल्याने याठिकाणी त्यांच्या नावे अभ्यास केंद्र बांधण्यात येत आहे. ते 'बीएनएचएस'चे संचालक राहिले असल्याने आणि त्यांच्याच काळात संस्था नावारुपास आल्याने या केंद्राच्या भविष्यातील नियोजनाची जबाबदारी 'बीएनएचएस'ला देण्यात येणार आहे.