मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Tiranga Rally at Kashmir) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काश्मीरच्या वतीने गुरुवार, दि. ३० जानेवारी रोजी भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. “तिरंगा के शान में, काश्मिरी युवा मैदान में” या संकल्पने अंतर्गत काश्मिरी तरुणांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरणा देणारी ‘शान-ए-तिरंगा’ ही रॅली काढण्यात आली. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे आणि काश्मीरमधील तरुणांमध्ये एकता आणि देशभक्तीची भावना वाढवणे हा रॅलीमागचा उद्देश होता. या रॅलीतून काश्मिरी युवांच्या देशभक्तीचे दर्शन झाले.
२०० मीटर लांबीचा तिरंगा हातात घेत काश्मीरच्या टीआरसी चौकातून रॅलीला सुरुवात झाली आणि प्रतिष्ठित घंटा घर, लाल चौक येथे अनेकजण रॅलीत सहभागी झाले. संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत होते. अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारी मंडळ सदस्य अकील अहमद तंत्रे यावेळी म्हणाले की, रॅलीचा प्राथमिक उद्देश अभाविपचा वारसा जपणे आणि राष्ट्र उभारणीतील एकतेच्या शक्तीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. भारताचे तरुण हेच देशाच्या प्रगती आणि अखंडतेचे प्रेरक शक्ती आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सक्रियतेला चालना देण्यासाठी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय चेतना बळकट करण्याच्या आपल्या ध्येयामध्ये अभाविप खंबीर आहे.