९२ वर्षांनी लागला 'या' माशाचा पुनर्शोध; तेजस ठाकरे आणि सहकाऱ्यांची कामगिरी

    31-Jan-2025   
Total Views |
rediscovery of Channa amphibeus


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
'स्नेकहेड' या मत्स्यप्रजातीमधील जगातून नामशेष झाल्याची शक्यता असणाऱ्या 'चन्ना एम्पिबियस' या प्रजातीचा ९२ वर्षांनी पुनर्शोध लावण्यात आला आहे (rediscovery of Channa amphibeus) . पश्चिम बंगालमधील चेल नदीमध्ये ही प्रजात सापडली असून १९४० साली तिचा शोध लावण्यात आला होता (rediscovery of Channa amphibeus). या शोधामुळे या दुर्मीळ प्रजातीचे छायाचित्रही पहिल्यांदाच जगासमोर उलगडले आहे (rediscovery of Channa amphibeus). आकर्षक चमकदार रंग असणाऱ्या 'चन्ना' कुळातील माशांना मत्स्यपालन व्यवसायात मोठी मागणी असल्याने त्यांच्या मासेमारीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. (rediscovery of Channa amphibeus)
 
 
सापासारखे तोंड असल्यामुळे चन्ना कुळातील माशांच्या प्रजातींना 'स्नेकहेड' म्हटले जाते. शरीरावरील विविध चकमणाऱ्या आकर्षक रंगासाठी या प्रजाती ओळखल्या जातात. यामधील 'चन्ना एम्पिबियस' या प्रजातीचा शोध १८४० मध्ये लावण्यात आला होता. १९३३ सालच्या दरम्यान या प्रजातीचे शेवटचे दर्शन झाले होते. त्यानंतर गेल्या ९२ वर्षांनी या प्रजातीचा पुनर्शोध लावण्यात आला आहे. संशोधक प्रवीणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, नल्लाथांबी मौलीधरन, बालाजी विजयकृष्णन आणि गौरब कुमार नंदा यांनी या प्रजातीचा पुनर्शोध लावला आहे. शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी 'झूटॅक्सा' या नियतकालिकामध्ये या शोधाचे वृत्त प्रकाशित झाले.
 
 
'चेल स्नेकहेड' या सर्वसामान्य नावाने ओळखली जाणारी 'चन्ना एम्पिबियस' ही प्रदेशनिष्ठ प्रजात हिमालयीन प्रदेशात आढळणारी मोठ्या 'स्नेकहेड' प्रजातींपैकी एक आहे. १८३० ते १८५० या काळात 'ईस्ट इंडिया कंपनी'मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे जाॅन मॅकक्लेलॅंड यांनी या प्रजातीचा शोध १८४० साली लावला होता. डी.एस.रसेल यांनी चेल नदीमधून हा मासा पकडून त्याचे नमुने जाॅन यांना दिले होते. त्यानंतर १९१८ आणि १९३३ साली या प्रजातीचे शेवटचे नमुने गोळ्या करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर, २०२४ साली संशोधकांना हा मासा पश्चिम बंगालमधील कालिम्पाॅंग जिल्ह्यातील गोरुबथन येथील चेल नदीच्या पात्राता मासेमारी करणाऱ्या मच्छिमाराच्या जाळ्यात आढळून आला. त्यांनी लागलीच हा मासा गोळा केला आणि गुणसूत्र तपासण व आकारशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांना हा मासा 'चन्ना एम्पिबियस' असल्याचे लक्षात आले. या प्रजातीचा रंग चमकदार आकर्षक असून तिच्या शरीरावर पिवळ्या आणि नारंगी रंगाचे पट्टे आहेत. या माशाचा कमाल आकार हा २०५ ते २७० एमएमच्या दरम्यान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 'स्नेकहेड' मत्स्यप्रजातींच्या शास्त्रीय वर्गीकरणाकडे संशोधकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. कारण, अनेक मत्स्यप्रजातींचे विक्री करणारे व्यापारी आणि मत्स्यप्रेमींनी या नव्या प्रजाती संशोधकांच्या नजरेस आणून दिल्या आहेत.
 
 
'चन्ना' कुळाविषयी
'चिन्नडे' या गटामधील 'चन्ना' कुळामध्ये 'स्नेकहेड'च्या ४८ प्रजातींचा समावेश आहे. पूर्व हिमालयीन प्रदेशात प्रदेशनिष्ठ 'स्नेकहेड'मध्ये विलक्षण भिन्नता आहे. पूर्व हिमालय प्रदेशातील ४८ पैकी एकूण १० 'चन्ना' प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. त्यापैकी ११ प्रजाती ईशान्य भारतातील राज्यात आढळतात.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.