नवी दिल्ली : भारताला येणाऱ्या काळात जागतिक नवनिर्मितीचे शक्तीकेंद्र बनवण्याचा निर्धार आहे, अशा शब्दांत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या कृत्रिम बुध्दीमत्ता मोहीम सुरुवात झाल्याचे सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच् या अभिभाषणाने शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर भारताचा आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. शनिवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन या आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे भारताला जागतिक नवनिर्मितीचे केंद्र बनवण्याचा निर्धार आहे. त्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता फार मोठी भूमिका बजावणार आहे. भारताच्या युपीआय प्रणालीनेही चांगले यश मिळवले आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रासमोर अमेरिकेच्या चॅटजीपीटी, चीनच्या डीपसेक तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. पण त्यातून भारतीय तंत्रज्ञ नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.
केद्र सरकार विविध पातळ्यांवर चांगले काम करत असून त्यांच्याकडून उभरत्या मध्यमवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न अतिशय स्तुत्य आहेत. भारतीय नारीशक्तीचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी कौतुक केले. भारतीय महीला निरनिराळ्या क्षेत्रांत उत्तम कामगिरी करत आहेत, ऑलिंपिक सारख्या खेळांत पदक मिळवणे असो, वैमानिक बनणे, तसेच कॉर्पोरेट जगतात प्रगतीची नवी शिखरे गाठणे यांसारखी कामगिरी भारतीय महिला करत आहेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले. केंद्र सरकारच्या लखपती दीदी सारख्या योजनांनी देशातील महीला सक्षमीकरणास हातभारच लावला आहे, असे नमुद करत राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची पाठराखण केली.
भारताच्या अर्थसंकल्पात देशाला दिशा देण्यासाठी काय महत्वाचे निर्णय घेतले जाणार याकडे सर्व देशाचे लक्ष आहे. करसवलत, रोजगारवाढ या गोष्टींवर नेमक्या योजनांची अपेक्षा उद्योगजगताकडून केली जात आहे.