पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत अभिजात साहित्य नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
हे वाचलंत का? - मालेगावच्या काँग्रेस, उबाठा आणि एमआयएमच्या आमदार, खासदारांकडून किरीट सोमय्यांना धमकी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा जमाना आहे. तंत्रज्ञान हे एखाद्या घोड्याप्रमाणे असते. त्याला घाबरून किंवा नाकारून चालत नाही. त्याच्यावर मान ठोकून बसायची असते. आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा असतो. आपण मराठीला ज्ञानभाषेत परिवर्तित करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये आपल्या सगळ्या साहित्यिकांचे साहित्य टाकून त्याचे मॉडल तयार केले तर येणाऱ्या पिढीला त्यांचे साहित्य मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून या मॉडेलच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत अभिजात साहित्य नेण्यासाठी मराठी भाषा विभाग पुढाकार घेईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
"उदय सामंत यांनी विश्व मराठी संमेलना मुंबईतून पुण्यात आणले. विद्येचे माहेरघर आणि प्रमाण मराठीच्या माहेरघरी हे विश्व मराठी संमेलन होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले संमेलन आहे. येत्या पाच वर्षात एकतरी संमेलन परदेशात घेऊन तिथे मराठीचा डंका वाजवू," असे ते म्हणाले.
सावरकरांशिवाय मराठीचा विचार करू शकत नाही!
"स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय आपण मराठीचा विचार करू शकत नाही. त्यांनी माय मराठीला शब्दांचा खजिना दिला. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन किंवा विश्व मराठी संमेलन यात वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायी भाव आहे. आपण संवेदनशील लोक आहोत. त्यामुळे वाद विवाद, प्रतिवाद झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकते. जगाच्या पाठीवर एकही देश नाही जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. आम्ही जगभरात कुठेही गेलो तरी तिथे मराठी माणसे आमच्या स्वागतासाठी असतात. दावोसमध्ये रात्रभर प्रवास करून मराठी माणसे स्वागतासाठी आले होते. एका चिमुरड्याने लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गीत खूप सुंदर म्हणून दाखवले. त्याच्या मनात माय मराठी असून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हे बघून आनंद झाला," अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
मी पुन्हा येईन!
"मी पुन्हा येईन हे शब्द माझा पिच्छाच सोडत नाही. मागच्या काळात उपहासाने म्हणायचे पण अलीकडच्या काळात चांगल्याने म्हणतात. एखादा शब्द आपल्याला चिकटल्यावर काळ आणि वेळेप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात. तुम्ही सगळ्यांनी हे ठरवावे, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन," असेही ते म्हणाले.
"भाषा ही भावना व्यक्त करण्याचे, संपर्काचे आणि अभिव्यक्तीतून सृजन करण्याचे साधन असते. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे राज मान्यता आहे. ज्या काळात मुघलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती त्याकाळात छत्रपती शिवरायांनी राजपत्र काढले आणि आपल्या साम्राज्याची भाषा मराठी केली. त्यामुळे मराठी भाषेला राज मान्यता देण्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली. मराठीची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत. मराठी काही किलोमीटरवर बदलत असली तरी प्रत्येक ठिकाणी तिची गोडी वाढतच जाते. मराठीच्या बोलीभाषेच्या साहित्यातील गोडी आणि काव्य मनाला भावनारे आहे. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याठिकाणी गुणवत्ता आणतो. तिथल्या दुधात साखरेचे काम करतो. जगाच्या वेगवेगळ्या भागात मराठी माणसाची किर्ती आहेत. मराठीची परंपरा पुढे नेण्यासाठी विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून आपण मराठी जगवण्याची, टिकवण्याची आणि समृद्ध करण्याची साद घालत आहोत. मराठी साहित्य मराठीला जिंवत ठेवणारे साहित्य आहे. मराठी रंगभूमीने जगाच्या पाठीवर नाट्य संस्कृती टिकवली आहे. येत्या १५ दिवसांत इंग्लडमधील मराठी मंडळाला जागेच्या संदर्भातील मदत देऊ. यासोबतच दिल्लीतील मराठी शाळा अव्याहतपणे चालण्यासाठी महाराष्ट्र शासन मदत करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.