अमरावतीच्या विकासात्मक बदलासाठी प्रयत्न करणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन

    31-Jan-2025
Total Views |
 
Bawankule
 
अमरावती : अमरावतीमध्ये सर्वच पक्षांना सोबत घेऊन विकासात्मक बदलाचा प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी ते अमरावती दौऱ्यावर होते. दरम्यान, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महिन्यातील किमात तीन ते चार दिवस मी अमरावती जिल्ह्याचा प्रवास करणार आहे. अमरावती जिल्ह्याची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती तसेच सांस्कृतिक, धार्मिक परंपरा, मेळघाटसारखा आदिवासी भाग आणि अमरावती शहराला डबल इंजिन सरकारच्या सर्वच योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची माझी जबाबदारी आहे. आम्हाला मिळालेल्या जनादेशातून आम्ही पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून काम करत आहोत. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असताना मला अमरावती जिल्ह्यालासुद्धा न्याय द्यायचा आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 
हे वाचलंत का? -  कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अभिजात साहित्य पुढच्या पिढीपर्यंत नेणार!
 
"अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समिती वाढवायची आहे. आता असलेल्या समितीतीत पूर्ण विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे यावर्षी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना डीपीसीची किंमत वाढवण्याची विनंती करणार आहे. या पैशातून सर्व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. अमरावतीकरांच्या आशा अपेक्षा मोठ्या आहेत. अमरावतीला नागपूर शहराच्या बरोबरीत आणू शकत नाही परंतू, प्रति नागपूर म्हणून अमरावतीलासुद्धा सर्व बाजूंनी चांगले करण्याचा प्रयत्न करू. अमरावतीमध्ये विकासात्मक बदलाचा विचार करू. अमरावती जिल्ह्याच्या वाट्याचा पैसा आणण्याची जबाबदारी माझी आहे. सर्वच पक्षांना सोबत घेऊन अमरावतीच्या विकासासाठी प्रयत्न करू. विरोधकांनीसुद्धा अमरावतीसाठी काही चांगले काम आम्हाला सांगावेत. २०२५ हे कार्यकर्त्यांच्या निवडणूकीचे वर्ष आहे. या वर्षात आम्ही महायूती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना सामोरे जाणार आहोत," असेही त्यांनी यावेळी सांगितले.