जीवनात नेमके ध्येय काय असावे, हे अनेक ग्रंथ शिकवितात आणि व्यक्ती दर्शवितात. रणरागिणीच तयार करण्याचे हे ध्येय अत्यंत प्रेरक.
शारीरिक शिक्षण हा विषय ६० ते ८०च्या दशकात, शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. आजही या विषयाचे महत्त्व कमी झालेले नाही. मात्र एखाद्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये या विषयाचे धडे देण्यात आणि त्यात कालानुरुप नाविन्य आणण्यात, पुण्यातील प्रा. डॉ. अनुराधा लक्ष्मी शाहू येडके हे नाव अग्रस्थानी आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजचा काळ महिला आणि मुलींसाठी आव्हानात्मक आहे. याच मुलींना आत्मसंरक्षणार्थ सज्ज करण्यासाठी किंबहुना अनेक रणरागिणी तयार करण्यासाठी, प्रा. डॉ. अनुराधा यांची वाखाणण्याजोगी धडपड चालली आहे. आपल्या मूळ भारतीय खेळ आणि व्यायामाच्यापद्धतींना विकसित करण्याचे व्रत घेतलेल्या, अनुराधा येडके यांचा प्रवास थक्क करणारा आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक आहे.
शारीरिक शिक्षण आणि खेळ क्षेत्रात योगदान देणार्या, अनुराधा यांचा १९ वर्षांपासून शारीरिक शिक्षण आणि खेळ या क्षेत्रात वावरच नाही, तर प्रभुत्वदेखील आहे. त्यांनी पुण्यातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमधून, विविध वयोगटांतील मुलांना शारीरिक शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य केले आहे. अॅथलेटिक्स, खो-खो, थ्रो-बॉल, मल्लखांब, बॅडमिंटन इ. खेळांमध्ये त्यांचे विद्यार्थी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. अनुराधा येडके या ‘शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी’च्या संचालक-अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्या समाजातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, सतत कार्यरत असतात. त्यांनी सहा हजार मुलांना आजतागायत प्रशिक्षत केले आहे. यावर्षी त्यांच्याकडे ६५० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.
संस्थेमार्फत पुण्यातील पटवर्धन बाग, एरंडवणा भागात ’स्पोर्ट्स नर्सरी’ नावाने, मुलांसाठी खेळाची पूर्व तयारी, मैदानी खेळ, मल्लखांब, दोरीचा मल्लखांब, कबड्डी व संस्कारवर्ग घेतले जातात. यामध्ये वय वर्षे अडीच व त्यापुढील मुले-मुली सहभागी होतात.
प्रा. डॉ. अनुराधा यांचा नेहमीच भारतीय खेळ आणि परंपरांवर भर असतो. मुलींना खेळात प्रोत्साहन देण्यासाठी निवडचाचणी घेत, त्या उत्तीर्ण मुलींसाठी मोफत प्रशिक्षण देतात.
मुलांमध्ये भारतीय खेळ आणि व्यायाम यांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने अनुराधा घेत असलेल्या उपक्रमांची, पालक आणि मुले आतुरतेने वाट पाहात असतात.’ मोटोर स्किल लर्निंग प्रोग्राम अर्थात बालवाटिकेमध्ये, लहान मुलांची शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेण्यात येतेे. खेळातील विविध हालचालींचे महत्त्व ओळखून, त्यांनी वय वर्षे अडीच ते सात या वयोगटातील मुलांसाठी हा उपक्रम राबवला आहे. वय वर्षे सातच्या पुढील खेळाडूंना संस्थेमार्फत मल्लखांब, कबड्डी या खेळांचे स्पर्धात्मक प्रशिक्षण त्या देतात. त्यांच्या या ज्ञानदानाची दक्षिणा म्हणजे, २०२३-२४ मध्ये त्यांच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत एक आणि शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत दोन, अशी एकूण तीन पारितोषिके पटकावली आहेत.
मुलींनी खेळामध्ये मुलांच्या बरोबरीनेच पुढे यावे, यासाठीही अनुराधा ‘खेळाडू दत्तक योजना’ राबवितात. यात निवडक मुलींना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी पुण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील, चार हजार मुलींना प्रशिक्षित केले आहे. येणार्या काळात, जास्तीत जास्त मुलींना लाठीकाठी आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे.
पुण्यातील महिलाश्रम हायस्कूल, सेंट क्रिस्पीन्स स्कूल, शिशु विहार माध्यमिक शाळा, अभिनव, पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर शाळा, डी. आर. नगरकर प्रशाला, चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय, सिद्धी विनायक महाविद्यालय, तेजस्विनी हेल्थ क्लब अशा विविध संस्थांमधून अनुराधा यांनी प्रशिक्षणवर्ग घेतले आहेत. तसेच चांगला व वाईट स्पर्श यावर व्याख्याने देणे, मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप अशा विविध कार्यक्रम करण्यावर यावर त्यांचा भर असतो. याहीपेक्षा अधिक दखल घेण्याजोगे म्हणजे, अनुराधा यांचे कोविड काळातील सेवाकार्य! अनुराधा यांनी पुणे मनपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत चालविल्या जाणार्या, ‘गरवारे कोविड केअर सेंटर’ आणि ‘कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’त स्वतः निवासी राहून, तेथील रुग्णांची सेवा केली. त्यांच्या या कार्याची दखल समाजाने घेणे अपरिहार्यच ठरते. त्यामुळे त्यांना, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारसंघ व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्यावतीने दिला जाणारा, ‘वुमन रायझिंग स्टार अॅवॉर्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शिवाय, चंद्रशेखर आगाशे शारीरिक महाविद्यालयाचा ‘प्राईड ऑफ आगाशे’ हा पुरस्कार, ‘मराठीबोली, पुणे’ या सामाजिक संस्थेचा ‘आदर्श क्रीडा संस्था पुरस्कार’, लोट्स बिझनेस स्कूलचा ‘जिद्दी वुमन पुरस्कार’, कोविड रुग्णांची सेवा केल्याबद्दल पुणे मनपा पुरस्कृत ‘कोरोना योद्धा पुरस्कार’,व्ही लीगल असोसिएट्सकडून दरवर्षी महिला दिनानिमित दिला जाणारा पुरस्कार, डॉ. अनुराधा येडके यांना मिळाला आहे. याशिवाय, अन्य पुरस्कारदेखील त्यांना मिळाले आहेत. प्रा. डॉ.अनुराधा येडके यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध विषयांवर sportsnurserypune.com या आपल्या ब्लॉगवर लेखन केले आहे. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
अतुल तांदळीकर