वाढदिवसानिमित अंकुश चौधरीने केली मोठी घोषणा : ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ - कॉमेडी ॲाफ टेरर्स’!

    31-Jan-2025
Total Views |


ankush chaudhary no entry


मुंबई : 'नो एंट्री पुढे धोका आहे' या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि 'जपून जपून जा रे' या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. आता लवकरच सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी याने स्वतः 'नो एंट्री पुढे धोका आहे २ - कॉमेडी ऑफ टेरर्स' ची सोशल मीडियावर घोषणा केली आहे.
सध्या बॅालिवूड, हॅालिवूड, टॅालिवूडमध्ये फ्रेंचाइजीचा ट्रेंड असून मराठीतही हा ट्रेंड रूजू लागला आहे. प्रेक्षकांना असे चित्रपट आवडतात. म्हणूनच ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ - कॅामेडी ॲाफ टेरर्स ’ डबल धमाल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निखिल सैनी फिल्म्स अँड एंटर टेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी करणार आहे. पोस्टरमध्ये स्टायलिश लूकमधील अंकुश चौधरी दिसत असून त्याच्या बाजूला दोन मुली दिसत आहेत. ज्या अर्ध्या मुलीच्या रूपात आहेत तर अर्ध्या यंत्रमानव रूपात आहेत. त्यामुळे यात आधुनिक तंत्रज्ञानाची जादू पाहायला मिळणार हे नक्की! कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाला नकाश अजीज आणि सरगम जस्सू यांचे संगीत लाभले आहे. सध्यातरी या चित्रपटात कोण कलाकार असतील, हे गुलदस्त्यात असले तरी हा चित्रपटही बॉक्स ऑफिस गाजवणार.
अभिनेता, दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, ‘’ आज वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तो खूपच भारावणारा आहे. तुमच्या प्रेमाखातरच मी रिटर्न गिफ्ट म्हणून या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येतोय. ‘नो एंट्री’च्या पहिल्या भागावर प्रेक्षकांनी प्रेम केले. चाहत्यांचा आदर राखत आम्ही आज दुसऱ्या भागाची घोषणा करत आहोत.’’
चित्रपटाचे निर्माते निखिल सैनी म्हणतात, ‘’ आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. चित्रपटाची टीम इतकी कमाल आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. प्रेक्षकांसह आम्हीसुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत.’’