मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे

30 Jan 2025 12:38:35

cm relief fund
 
मुंबई : (Chief Ministers Relief Fund) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
 
या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय हे अध्यक्ष असतील. तसेच, आरोग्य संचालनालयाचे संचालक, आयुष संचालनालयाचे संचालक, सर ज. जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालयाचे अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. तात्याराव लहाने, एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. रमाकांत देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ( छत्रपती संभाजीनगर) चे सचिव डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, के.ई.एम रुग्णालयचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, टाटा मेमोरियल सेंटर (परळ, मुंबई ) चे संचालक अकॅडमी डॉ. श्रीपाद बनावली, कौशल्य धर्मादाय रुग्णालय (ठाणे) चे संचालक डॉ. संजय ओक, बॉम्बे हॉस्पिटल, नेफरोलॉजी विभागचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. बिच्छू श्रीरंग, पी.डी. हिंदुजा रुग्णालय (मुंबई) चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. जॉय चक्रवर्ती, नायर हॉस्पिटल मधील ह्रदयविकार विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अजय चौरसिया, बॉम्बे हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेसिविस्ट डॉ. गौतम भन्साळी, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (नागपूर) चे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (पुणे) यांच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट कमिटीचे सचिव डॉ. माधव भट हे सदस्य म्हणून कार्यरत राहतील. तसेच, याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता सध्या अस्तित्वात असलेल्या २० आजारांपैकी इतर शासकीय योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांचे पुनर्विलोकन करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ही समिती सहाय्यता मिळण्याकरिता नवीन आजार समाविष्ट करणेबाबत शिफारस करणे, रस्ते अपघात वगळून इतर अपघात प्रकरणामध्ये घ्यावयाच्या कागदपत्रांची निश्चिती करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता आजारांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यांच्या रकमांचे पुनर्विलोकन ( समीक्षण) करुन अनुज्ञेय रक्कम (मंजूर रक्कम) नव्याने निर्धारित करण्याची शिफारस करणे यासाठी ही समिती स्थापन झाली आहे.
 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता रुग्णालय संलग्नीकरणासाठी रुग्णालयाच्या तपासणीचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, केंद्र-राज्य सरकारच्या वैद्यकीय उपचाराबाबत असलेल्या इतर योजनांच्या धर्तीवर निकष ठरविणेबाबत शिफारस करणे याकरिता ही समिती गठीत करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने वैद्यकीय उपचाराबाबत वेळोवेळी विविध विषयांच्या अनुषंगाने विचारणा केल्यास ही समिती त्या विषयांबाबत शिफारस सादर करेल.
 
 
Powered By Sangraha 9.0