महाकुंभातील मृतांना उत्तरप्रदेश सरकारकडून प्रत्येकी २५ लाखांची मदत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त करत मदतीची केली घोषणा

    30-Jan-2025
Total Views |

 Mahakumbh 2025
 
लखनऊ : उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभातील (Maha Kumbh 2025) अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६० जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने ही माहिती दिली आहे. या घटनेवर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली जाईल. तसेच या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आवश्यक त्या सूचनाही बदलण्यास सांगितल्या आहेत.
 
योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. त्यावेळी ते म्हणाले की, सरकारने निर्णय घेतला की, या घडलेल्या घटनेच्या पाश्चात घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. आता महाकुंभ परिसरामध्ये सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
 
महाकुंभ परिसरामध्ये नो 'व्हेईकल झोन' घोषित करण्यात आला. परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनाला परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, व्हीआयपी पासही रद्द करण्यात आले आहेत. कुंभ परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या पासच्या मदतीने वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय सर्व रस्ते एकपदरी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे कोणत्याही मार्गावर भाविकांची गर्दी निर्माण होऊन त्रास होऊ नये असा प्रशासनाने निर्णय घेतला. 
 
 
 
तसेच बाहेरून येणारी वाहने प्रयागराजच्या सीमेवरच थांबवली जातील. त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच शहरामध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली. रुग्णवाहिका, दुचाकी वाहन आणि अग्निशमन अशा वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित केले जाईल जेणेकरून वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही.
 
महाकुंभात सध्या भाविकांची गर्दी पाहता महामंडळाच्या जादा बसेसचा वापर व्हावा. लोकांना वास्तव्याची सोय व्हावी आणि त्यांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय व्हावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे या घडलेल्या घटनेनंतर वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी तैनात रहावे. अयोध्या आणि वाराणसीमध्ये यंत्रणा सुरळीत करण्याचे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
कौशांबी, वाराणसी, अयोध्या, मिर्झापूर, बस्ती, जौनपूर, चित्रकूट, बांदा, आंबेडकर नगर, प्रतापगढ, संत कबीर नगर, भदोही, रायबरेली यासह अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आदित्यनाथ यांनी निर्देश दिले होते. तर गोरखपूर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी रात्री उशिरा व्हि़डिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली.