श्रीसिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम
30-Jan-2025
Total Views |
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेशोत्सवानिमित्त प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी पारंपरिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. या उत्सवामध्ये गुरुवार, दि. ३० जानेवारी ते मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न्यासच्यावतीने करण्यात आले आहे.
उत्सवादरम्यान दररोज पहाटे श्रींची काकड आरती, महापूजा व महाआरती करण्यात येणार आहे. तसेच श्रीब्रह्मणस्पती सूक्त, श्रीसूक्त जप अभिषेक, अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन महापूजा अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर भाविकांसाठी नियमित सामूहिक नामस्मरणाचा कार्यक्रम असणार आहे. उत्सवात दरदिवशी भक्ती संगीत आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. गणेशभक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष पर्वणी असणार आहे. प्रख्यात गायक आणि वादकांचे सुरेल सादरीकरण, शास्त्रीय नृत्याविष्कार हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. यामध्ये प्रसिद्ध बासरीवादक पंडित रोनु मुझुमदार, तबलावादक पंडित आदित्य कल्याणपूर, उस्ताद तौफिक कुरेशी, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार डॉ. एल. सुब्रमण्यम, गायिका कविता कृष्णमूर्ती या आणि यांसारख्या अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा माघी गणेशोत्सवाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
या सहा दिवसांच्या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीगणेशाचे दर्शन तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक मंदिर व न्यासचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी केले आहे.