पुणे : “दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनमध्ये केले याचा अभिमान आहे. देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य साहित्य संमेलन होत आहे ही जगभरातील मराठी माणसांकरिता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या साहित्य संमेलनाकरिता सातत्याने एक मोठी टीम काम करत आहे. ते यशस्वी होण्यासाठी जवळपास ७० लोक दिवसरात्र काम करत आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन यशस्वी होण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा या कार्यक्रमात येण्यासाठी होकार दिला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन असल्याने तमाम मराठी जगतात याबाबत उत्सुकता आहे. या माध्यमातून विचार प्रवर्तनाचे काम होईल, असा विश्वास आहे” अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिल्लीमधील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केल्या. “हा कार्यक्रम कोण्या संस्थेचा किंवा व्यक्तीचा नसून तमाम मराठी जनांचा आहे. त्यामुळे कुठेही काही कमतरता असल्यास आम्ही ती पूर्ण करू. या संमेलनाकरिता आवश्यक असलेली अधिकची मदत दिली जाईल.” असे आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिले आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील तालकटोरा येथे २१ ते २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षा तर शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडणार आहे.