१६ हजार संघ स्वयंसेवक महाकुंभातील सेवाकार्यात तत्पर!
30-Jan-2025
Total Views |
मुंबई (ओंकार मुळ्ये) : (RSS Sevakarya at Mahakumbh) मौनी अमावस्येदरम्यान महाकुंभमेळा परिसरात पहाटे झालेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यु झाला, तर ६० जण गंभीर जखमी झाले. यावेळी उत्तर प्रदेश सरकारसह महाकुंभ परिसरात तत्पर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सुद्धा आपापल्या भागात सेवा कार्याचा वेग वाढवला. विविध गटात विभागलेल्या स्वयंसेवकांनी प्रसंगावधान दाखवत दुर्घटनाग्रस्त भाविकांना मदत करून त्यांना सुखरुप ठिकाणी नेण्यास त्यांनी सुरुवात केली. यापैकी काही स्वयंसेवक वाहतूक व्यवस्थेत प्रशासनाला मदत करत असून काहीजण यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी भोजनव्यवस्था करण्यात व्यस्त आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अशा भव्य स्वरूपात होणाऱ्या धार्मिक कार्यात सेवा कार्यासाठी सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून भाविकांची प्रयागराज नगरीत रेल्वेस्थानक, बसस्थानक, घाट परिसरात मोठी गर्दी होत असल्याने त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी प्रशासनासह १६ हजार संघ स्वयंसेवक उल्लेखनीय सेवा कार्य करत आहेत. हरवलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडणे, अन्नाचे वितरण, प्रथमोपचार, मार्गदर्शन आणि स्वच्छता मोहिम अशा विविध कामांत ते महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतायत.
मौनी अमावस्येनिमित्त संगमात स्नान करण्यासाठी आलेले लाखो भाविक संघाचे कार्य पाहून प्रभावित झाले. स्वयंसेवकांनी कोणताही भेदभाव न करता सर्व भाविकांची सेवा केली आणि त्यांना त्यांच्या सुविधांचा लाभ दिला. श्यामा प्रसाद मुखर्जी नगरच्या स्वयंसेवकांनी महाकुंभमेळा परिसराचे उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ, तर पश्चिम दारागंज आणि सुभेदारगंजमधील रज्जू भैय्या नगरमध्ये स्वयंसेवकांनी भंडारा आयोजित केला होता. तसेच भाविकांच्या चहापानाची व्यवस्थाही करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी प्रयागराजच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर आणि बसस्थानकांवर विशेष सहाय्य शिबिरे उभारली आहेत. जिथे येणाऱ्या भाविकांना संगम तिरावर पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
पायावर स्प्रे लावून भाविकांना दिलासा
मौनी अमावस्येच्या शुभमुहूर्तावर लाखो भाविकांनी संगमाच्या तीरावर श्रद्धेने स्नान केले. यावेळी प्रयाग दक्षिण भागातील श्री राम नगर येथील स्वयंसेवकांनी संगमात स्नान करण्यासाठी पायी आलेल्या भाविकांच्या पायावर स्प्रे लावून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेकांच्या पायाला होणाऱ्या वेदना, आलेली सूज काशीही कमी झाली. संगम तीरावरही वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवक सक्रीय होते. थकवा आल्याने कोणताही भक्त थांबला की लगेच पुढे येऊन, ते त्याची विचारपूस करून, त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होते. अनेक वयोवृद्ध भाविक व मातांनी स्वयंसेवकांना आशीर्वाद देत संघाचे स्वयंसेवक गरजूंच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
अभाविपकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभामध्ये सुरुवातीपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विविध आयामांतून सेवाकार्य करत आहेत. नुकत्याच मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेनंतरही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत भाविकांची सेवा व मदतीसाठी तत्पर होते. तसेत पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांनासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ते करत आहेत. परिसरातील सेक्टर ७ मधील अभाविपच्या शिबिरात स्नानार्थींच्या विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे.