नवी दिल्ली : हरियाणातील यमुना नदीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केला. हरियाणा भाजपने हे सर्व कृत्य केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. याचपार्श्वभूमीवर आता हरियाणा न्यायालयाने केजरीवाल यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हरियाणा सरकारने दाखल केलेल्या एका प्रकरणाबाबत हा आदेश देण्यात आला आहे.
केजरीवाल यांनी केलेल्या दाव्यामुळे निवडणूक आयोगानेही त्यांना धारेवर धरले आहे. केजरीवाल यांनी विष मिसळल्याच्या दाव्यावर पुरावे मागितले आहेत. त्यावर केजरीवाल यांनी अमोनियाचे प्रमाण अधिक वाढल्याचे सांगितले आहे. यामुळे आता हरियाणातील सोनपतमध्ये असलेल्या न्यायालयाने बुधवारी २९ जानेवारी २०२५ रोजी म्हटले की, अरविंद केजरीवाल यांना १७ फेब्रुवारी २०२५ रोजी नोटीस जारी केली होती. त्यांना पुढील सुनावणीच्या तारखेला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे निर्देश जारी केले आहे.
न्यायालयाने म्हटले की, दिलेल्या तारखेलाच पुढील सुनावणी होईल. यावेळी न्यायालयामध्ये जर हजर राहिला नाहीतर प्रतिक्रिया दिली नसल्याचे गृहित धरले जाईल. हरियाणा सरकाने अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत हे प्रकरण दाखल केले, केजरीवाल यांनी यमुना नदीमध्ये विष मिसळल्याचा खोटा दावा केला आणि जनतेची दिशाभूल केली असल्याचे हरियाणा सरकारचे म्हणणे आहे. यानंतर आता सोनीपतच्या काही ग्रामस्थांनी यावर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
केजरीवाल यांनी यमुना नदीच्या पाण्यासंबंधित केलेल्या वक्तव्याचा हवाला एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता. हरियाणातील भाजप सरकारला दिल्लीकरांचा जीव घ्यायचा आहे. दिल्ली जल बोर्डामुळे हे प्रकरण थांबवल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी मानहानिचा खटला दाखल करण्याची घोषणा केली आहे. तसेच केजरीवाल यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचे उत्तर मागितले आहे.