मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांची भूमिका अधिकृत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
30-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका अधिकृत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुरुवार, ३० जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "धनंजय मुंडे त्यांच्या कामासाठी दिल्लीला आले होते. मी माझ्या कामासाठी आलो होतो. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात आणि मीसुद्धा त्यांना कधीही भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली असून त्यांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे."
"पुण्यातील आणि बुलढाण्यातील विषय वेगळे आहेत. बुलढाण्यामध्ये पाण्यात काही अधिकच्या गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यासंबंधी एक रिपोर्ट आम्ही घेतला असून त्याचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर निष्कर्षापर्यंत पोहोचू. पुण्यात नांदेड शहराच्या भागातून विहिरीतून येणाऱ्या पाण्यात जास्त प्रदुषण आढळले. जीबीएसचे रुग्ण हे पहिल्यांदा आढळले नाही. हे रुग्ण सातत्याने आपल्याकडे असतातच. पण या भागात जास्त रुग्ण आढळले आहेत. याचा मागोवा घेतल्यानंतर एका विहीरीच्या दुषित पाण्यामुळे हे होत असल्याचे लक्षात आहे. यावर उपाययोजना केल्यावर ही प्रकरणे कमी होत आहेत. मात्र, या सगळ्या प्रकरणाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत आहोत," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.