मुंबई : भारतीय संस्कृती ही कायमच पर्यटकांचे आकर्षण राहीली आहे. येणाऱ्या काळात भारत हा जागतिक पर्यटनाचे केंद्र होईल, भारतीय पर्यटनाचा मूलमंत्र हा अतिथी देवो भव हाच राहणार आहे, अशा शब्दांत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मांडले. आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल शो असा लौकिक असलेल्या ओटीएम चे उद्घाटन गुरुवारी मुंबईतील जीओ कनव्हेशन सेंटर येथे झाले. या मोठ्या ट्रॅव्हल शोमध्ये भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासह ६० देशांतील २ हजार प्रदर्शक सहभागी झाले आहेत. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी असा तीन दिवस हा शो चालणार आहे.
भारत हा जगात हा असा कदाचित एकच देश असेल की ज्यात प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या संस्कृती एकत्र नांदतात त्यामुळे भारतात एखाद्या पर्यटकाला हव्या असणाऱ्या सर्वच गोष्टी आहेत. त्यामुळे भारत हे जगाचे पर्यटन तसेच सांस्कृतिक केंद्र बनेल असे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह म्हणाले. पर्यटन व्यवसाय वृध्दींगत व्हावा यासाठी सर्व पायाभूत सुविधा जसे की रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्गांचे जाळे विस्तारणे, हवाई मार्गांचा प्रसार यांसारखे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील पर्यटन वाढावे यासाठी पुढाकार चलो इंडिया, देखो इंडिया या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामुळे भविष्यात भारत हा जगातील पर्यटन बाजारपेठेचा मोठा हिस्सा व्यापेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन शेखावत यांनी केले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या शोमध्ये विविध देशांतील पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले आहेत. भारतातील सर्व राज्यांचे तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ओटीएम हा जगभरातील पर्यटन व्यावसायिक तसेच धोरणकर्ते यांना संवाद साधण्यासाठी तसेच व्यावसायिकांना व्यवसाय वृध्दीसाठी एक मोठे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.
उत्तराखंड पर्यटन व्यवसायाचे बदलते चित्र
भारतातील उत्तराखंड हे कायमच पर्यटकांच्या प्रथम पंसतीवर असते. हिमालयाचे सानिध्य आणि असलेल्या अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांमुळे उत्तराखंड ही खऱ्या अर्थाने देवभूमी बनली आहे. आता उत्तराखंड आपली अध्यात्मिक ओळख जपून एक सर्वसमावेशक पर्यटन स्थळ म्हणून देखील उदयाला येत आहे. येथील वनपर्यटन उदयाला यावे यासाठी उत्तराखंड पर्यटन विभागाकडून उत्तराखंडमधील राष्ट्रीय उद्याने, तेथील दऱ्या – खोऱ्यांचे सौंदर्य यांचे संवर्धन आणि विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही मोठी गोष्ट आहे. उत्तराखंड हे भारतातील असे कदाचित एकमेव राज्य असेल जिकडे बाराही महीने आकाश निरभ्र असते त्यामुळे नैनीताल यांसारख्या ठिकाणी त्यापध्दतीचे ऍस्ट्रो टुरिझम विकसित केले जाणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही उत्तराखंड हे राज्य कायमच संवेदनशील राज्य ठरले आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सरकारच्या वतीनेच राबवल्या जात आहेत. त्यामुळे उत्तराखंड राज्य हे पर्यटनाच्या दृष्टीने कात टाकत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांनी उत्तराखंडला भेट द्यावी असे आवाहन उत्तराखंड पर्यटन विभागाकडून करण्यात आले आहे.