ठाण्यातील पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

सॅटीससह तीन उड्डाणपुलांची आयआयटी करणार तांत्रिक तपासणी

    03-Jan-2025
Total Views |
Thane

ठाणे : ठाण्यातील ( Thane ) १५ ते २० वर्ष जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट ( संरचनात्मक तपासणी) करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यात स्टेशन परिसरातील सॅटीस पुलासह कळवा खाडीवरील जुना दुसरा पुल आणि मुंब्रा स्टेशन बाहेरील उड्डाणपूलाचा समावेश आहे. शहरातील वर्दळीचे समजले जाणारे हे पुल जवळपास १५ ते २० वर्ष जुने असल्याने स्लॅब,पिलर्स,साऊंड बेरिंग आणि सळ्यांची तपासणी पुढील आठवडया पासुन करण्यात येणार असुन यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेतली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे,दिवसा वर्दळीमुळे मध्यरात्रीनंतर तपासणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण २६ पुल आहेत. यामध्ये एएमआरडीए,एमएसआरडीसी, नॅशनल हायवे , सार्वजनिक बांधकाम तसेच महापालिकेचे उड्डाण पूल आहेत. त्यापैकी महापालिकेच्या मालिकेचे ८ उड्डाणपूल आहेत. तर कोपरी सॅटिस आणि नवीन ठाणे स्टेशन असे २ उड्डाणपूल प्रगतीपथावर आहेत. दरम्यान, शहरातील जुने उड्डाणपूल प्रवाशांच्या सोयीसाठी योग्य आहेत का? याची नियमित तपासणी महापालिका करीत असते. या अनुषंगाने १५ ते २० वर्ष जुन्या पुलांची सक्षमता जोखण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्यात कळवा खाडीपुलावरील जुना पुल, मुंब्रा स्टेशन बाहेरील उड्डाणपूल आणि दररोज लाखो प्रवाशांसाठी महत्वाचा समजला जाणार्‍या सॅटिस पुलाची तपासणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कळवा खाडीवरील जुना पुलाची निर्मिती १९९५ साली, मुंब्रा उड्डाणपुल २००८ तर सॅटिस पुलाचे लोकार्पण २००९ साली करण्यात आले आहे. हे प्रकल्प जवळपास १५ ते २० वर्ष जुने झाले असल्याने धोकादायक आहेत की सुस्थितीत आहेत ? याचा वापर नागरीकांना होऊ शकतो का? तसेच या पुलांचे आयुष्य अजून किती? याचा सखोल अभ्यास पुढील आठवडया पासुन करण्यात येणार असुन याकामी महापालिकेने १३ लाख ५० हजार शुल्क आयआयटीकडे भरले आहे.