मुंबई : अभिनेता सिद्धार्थ खिरीड याने आजवर मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. सिद्धार्थची 'फ्रेशर्स' ही मालिका प्रचंड गाजली होती. दरम्यान, सिद्धार्थ एक चांगला अभिनेता तर आहेच पण तो उत्कृष्ट डान्सर आहे हे देखील आपल्या सर्वांना माहितच आहे. सिद्धार्थने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या बायकोची झलक सोशल मीडियावर शेअर केली. त्यावेळी सिद्धार्थने तिचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र, आता त्याने तिचे नाव आणि चेहरा हे दोन्ही जाहिर केले आहे.
‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा गाजलेल्या मालिकांमधील नायक सिद्धार्थ खिरीडने काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यातील ‘Single अध्याय संपला’ म्हणत प्रेमाची कुबली दिली होती. प्रेयसीबरोबरचे रोमँटिक फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचा चेहरा दिसला नसल्यामुळे ती अभिनेत्री आहे की अजून कोण असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. आता या सगळ्या प्रश्नांची त्याने उत्तरं दिली आहेत.
सिद्धार्थ खिरीड सौंदर्यवती डॉ. मैथिली भोसेकरच्या प्रेमात आहे. ती फ्लोरीडा इथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ ची विजेती होती. याशिवाय पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती. मैथिली कॅनडात असते. त्यामुळेच अभिनेत्याने प्रपोज करतानाचे रोमँटिक फोटो शेअर करत त्यावर हटके कॅप्शन लिहिलं आहे. “दोन हृदय, दोन देश, दोन प्रोफेशन्स आणि त्यांची एक प्रेमकहाणी…या ड्रीम प्रपोजलचा व्हिडीओ लवकरच शेअर करेन”.