मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजण्याआधीच उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील 'उबाठा'चे माजी नगरसेवक एकेक करून महायुतीमध्ये प्रवेश करीत असताना, आता छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली आहे. शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
याविषयी नंदकुमार घोडेले म्हणाले, “जवळपास ३० वर्षांपासून शिवसेनेत काम करीत आहोत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागच्या काळात राज्यात ज्या प्रकारे काम झाले, त्याने प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हिंदुत्ववादी भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडायला नको होती. काँग्रेस पक्षाबरोबर युती केल्यानंतर त्याचा फटका बसला, असे मला वाटते. आता भविष्यात नागरिकांची कामे करायची असतील, तर सत्तेबरोबर असणे गरजेचे आहे, या भूमिकेतून आम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले.