एनएसईचा विक्रम, एका वर्षात २६८ आयपीओ दाखल!

तब्बल १ लाख ६७ हजार कोटींची भांडवल निर्मिती

    03-Jan-2025
Total Views |
 
 
nse
 
  
 
मुंबई : राष्ट्रीय भांडवली बाजार म्हणजे एनएसईने या वर्षात एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. २०२४ या एका वर्षात लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील तब्बल २६८ आयपीओ दाखल झाले असून त्यातून तब्बल १ लाख ६७ हजार कोटी रुपयांची भांडवल निर्मिती झाली आहे. सूचिबध्द होणाऱ्या कंपन्यांची वाढती संख्या आणि त्याला गुंतवणुकदारांचा मिळणारा प्रतिसाद यावरुन भारतीय गुंतवणुकदारांचा भांडवली बाजारांवरचा विश्वास वाढतो आहे असे एनएसई कडून सांगण्यात आले आहे.
 
 
यावर्षीचा सर्वात लक्षवेधी आयपीओ म्हणजे ह्युंदाई कंपनीचा २७,८७० कोटी रुपयांचा आयपीओ. हा जागतिक स्तरावरचा दुसऱ्या क्रमांकाचा आयपीओ ठरला. यावर्षी सूचीबध्द झालेल्या कंपन्यांमध्ये ९० मोठ्या कंपन्यांकडून १ लाख ५९ हजार कोटी तर उरलेल्या छोट्या कंपन्यांकडून ७,३४९ कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. २०२५ या वर्षी आयपीओ मधून होणारी भांडवल निर्मिती २ लाख कोटींचा आकडा पार करण्याची अपेक्षा आहे असे एनएसई कडून सांगण्यात आले आहे.
 
 
भारतीय भांडवली बाजारात वाढणारी गुंतवणुक ही भांडवली बाजारावर लोकांचा विश्वास वाढतोय हेच दाखवतोय. लोकांना या गुंतवणुकीचे महत्व समजत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ही गुंतवणुक अजून वाढेल. एकट्या भारतीय भांडवली बाजाराने, जपान, हाँगकाँग आणि चीन या तिन्ही बाजारांच्या एकत्रित एकूण आयपीओ पेक्षा भारतीय बाजाराने अधिक आयपीओ बाजारात आणले. यातून गुंतवणुकदारांचा विश्वासच सूचित होतो असे मत एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीरामकृष्णन यांनी नोंदवले आहे.