मुंबई: (Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थीं महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवार ३ जानेवारी रोजी माहिती दिली आहे. एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज अपात्र करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योजनेसंदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याची जाहीर घोषणा करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. योजनेसाठी एकूण दोन कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यातील दोन कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. बँक खात्याशी आधार कार्ड जोडल्या गेलेल्या दोन कोटी ३४ लाख जणींना योजनेचा लाभ मिळाला. निवडणुकीनंतर सरकारने बँक खाते जोडलेल्या १२ लाख ६७ हजार लाभार्थींना पहिल्यांदा निधी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाच महिन्यांचा लाभ घेतलेल्या बहिणींना डिसेंबरचा लाभ दिला जात आहे.
या योजनेवर सरकारकडून प्रतिवर्ष ४६ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार आहे. त्याचा परिणाम इतर योजना व पायाभूत सुविधांवर होणार आहे. या योजनेतील लाभार्थींच्या अर्जांची पडताळणी करणार आहे. त्यासाठी वर्धा, पालघर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्या असल्याचे कारण सांगितले जात आहे. ही पडताळणी तक्रारनिहाय केली जाणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. त्यानिमित्ताने केशरी व पिवळे कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार आहे.