गाव - शहरातील गरिबीची दरी कमी होतेय !

१२ वर्षात पहिल्यांदाच ग्रामीण दारिद्र्य ५ टक्क्यांच्या खाली

    03-Jan-2025
Total Views |
 

poverty  
 
 
 
 
मुंबई : देशातील सार्वत्रिक दारिद्र्याचे प्रमाण झपाट्याने घसरत आहे. भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय कडून केल्या गेलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. गेल्या बारा वर्षांत पहिल्यांदाच ग्रामीण भागातील गरिबीचे प्रमाण २५ टक्क्यांहून ५ टक्क्यांच्या खाली गेले आहे. २०२३-२४ या काळासाठी ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण ४.८६ टक्क्यांवर आले आहे.
 
 
शहरी दारिद्र्याबद्दल बोलायचे झाल्यास २०२४ मध्ये हे प्रमाण, ४.०९ टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. २०२१ साली अपेक्षित असलेली जनगणना कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. आता नियोजित जनगणना झाल्यावरती आपल्याला याबद्दलचे सुधारित आकडे मिळतील असे एसबीआयकडून जाहीर करण्यात आले आहे.
 
 
या अहवालातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे यात ग्रामीण आणि शहरी दरडोई उपभोग्य खर्चामधील फरक सातत्याने कमी झाला आहे. २०२२-२३ मध्ये हा फरक ७१.२ टक्के होता, तर २०२४ मध्ये हाच फरक ६९.७ टक्क्यांवर आला आहे. भारत सरकारकडून सातत्याने पायाभूत सुविधांवर केला जाणारा खर्च यांमुळे ही दरी कमी होत असल्याचा दावा या अहवालात केला गेला आहे. सरकारकडून केल्या जाणाऱ्या खर्चामुळे लोकांचे राहणीमान सुधारत असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी मागणीत वाढ होत आहे असे अहवाल सांगतो.