मुंबई, दि.३ : विशेष प्रतिनिधी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी आणि आजूबाजूच्या निवासी आणि अनिवासी गाळ्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि डीआरपीच्या माध्यमातून नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हेक्षण करत आहे. या सर्व्हेक्षणाला धारावीकरांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. "या सर्वेक्षणाला मूळ धारावीकरांचा विरोध नसून विरोध करणाऱ्यांनी धारावीतील या घाणीत राहून दाखवावे आणि मग विरोध करावा", अशी तीव्र भावना धारावीतील महिलांनी आणि नागरिकांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.
दरम्यान, धारावीच्या वेगवगेळ्या भागात झोपडपट्टीचे सर्वेक्षण व नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. मात्र, या सर्वेक्षणाबाबत आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध असल्याचा एक प्रचार धारावीत केला जात आहे. अशावेळी या अपप्रचाराला आता धारावीकरांनीच प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. धारावीतील सर्वेक्षण सुरु असलेल्या भागात दैनिक मुंबई तरुण भारतच्या टीमने भेट देऊन नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी बोलताना १९९६ पासून धारावीत वास्तव्यास असणारे गजानन मिस्त्री म्हणाले,"धारावीत आमची ही दुसरी पिढी आहे. माझं संपूर्ण बालपण या छोट्या घरात गेलं. बाजूलाच नाला आहे. पावसाळ्यात या नाल्याचं पाणी घरात येत. तीन दिवस अन्न पाण्याशिवाय राहण्याची वेळ येते. डास आणि घाणीचे साम्राज्य असते. आता आम्हाला पुनर्विकास हवा आहे. आमचे या प्रकल्पाला पूर्ण समर्थन आहे."
धारावीत करण्यात येत असलेले सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांवर दबाव आणला जात असल्याचा अप्रचार देखील करण्यात येत आहे. याबाबत बोलताना धारवीकर निलेश पडवळ म्हणाले,"आमच्यावर सर्व्हेक्षणासाठी कोणताही दबाव टाकण्यात येत नाही. नागरिक स्वतःहून आता आमचं सर्वेक्षण करा असं सांगत आहे. सर्वेक्षणाला येणारे अधिकारीही उत्तमरीत्या माहिती देतात. काही गावगुंड सर्वेक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांनाही स्थानिक धारावीकरांनी हाकलवून लावले आहे."
धारवीकर फरीद खान म्हणाले,"आम्हीही पहिल्यांदा या सर्वेक्षणाला विरोध केला होता. मात्र डीआरपीच्या अधिकाऱ्यांनी आमच्या सर्व प्रश्नाची उत्तर दिली आणि आम्ही या सर्वेक्षणात सहभागी झालो. मूळ धारावीतील नागरिक खूप जागरूक आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणी दारातील चप्पलही नेणार नाहीतर सर्व्हेक्षणासाठी कोणी बळजबरी काय करणार? कोणत्याही दबावाशिवाय धारावीकर सर्वेक्षणात सहभागी होत आहेत. विरोध करणाऱ्यांनी मागील ४० वर्षात काय विकास केला? त्यांनी धारावीतील या छोट्या झोपड्यात राहून दाखवावे", असे आव्हान खान यांनी प्रकल्प विरोधकांना केले.