नवी मुंबई, दि.३: नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई व नैना) विभागातर्फे सन २०२४मध्ये सिडको अधिकारक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक मोहिमा राबवून २,१०२ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आल्याची माहिती सिडको प्राधिकरणाने दिली आहे. या कारवाईमुळे २ लाख ६ हजार ४३१ चौ.मी. क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने सन २०२४या वर्षामध्ये ५४७ निष्कासन मोहिमांचे आयोजन करून ३०२ यशस्वी मोहीमांदरम्यान सिडको संपादित जमिनींवरील अतिक्रमणे हटविले. निष्कासित करण्यात आलेल्या बांधकामांमध्ये कच्ची बांधकामे, आरसीसी बांधकामे, टपऱ्या इ. समावेश होता. निष्कासन कारवाई करण्यापूर्वी २,१६० अनधिकृत बांधकाधारक/अतिक्रमणधारकांना एमआरटीपी अंतर्गत नोटीसा बजावून बांधकाम निष्कासित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या मोहींमादरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्थानकांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी वेळोवेळी योग्य तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला.
नवी मुंबई क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू (एमटीएचएल), उलवे सागरी मार्ग, नवी मुंबई मेट्रो, सिडकोचे गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्यात आले असून व इतर पायाभूत सुविधा प्रकल्प नियोजित किंवा प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील लौकिक अधिक वृद्धींगत होत असताना अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या विकासाला बाधा येऊ नये याकरिता अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामांविरुद्ध आयोजित करण्यात येणाऱ्या या मोहिमा महत्त्वाच्या ठरतात.
निष्कासन मोहिमांव्यतिरिक्त, नागरिकांना सावध करण्याकरिता सिडकोतर्फे अतिक्रमणधारक/अनधिकृत बांधकामधारकांना बजावण्यात आलेल्या नोटीसा वेळोवेळी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यात येतात. तसेच नागरिकांनी नवी मुंबई किंवा नैना क्षेत्रामध्ये सदनिका किंवा दुकाने खरेदी करताना संबंधित बांधकामाबाबतची कागदपत्रे तपासावीत व संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहनही सिडकोतर्फे करण्यात आले आहे.