‘राष्ट्रपती शौर्य पदक’ आणि अमेरिकेच्या ‘स्पार्टन पुरस्कारा’ने सन्मानित असलेले हेमंत अनंत बावधनकर. विरता आणि अचूक निर्णयक्षमता असलेल्या हेमंत यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा लेख...
शूरतेसाठी, देशनिष्ठेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांना भारत सरकारने ‘राष्ट्रपती शौर्य पदका’ने सन्मानित केले. तसेच, दहशतवादाचा सामना करणार्या साहसी व्यक्तींचा अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानही केला गेला. तो ‘स्पार्टन पुरस्कार’ सन्मानही हेमंत बावधनकर यांना प्राप्त झाला. तसे पाहिले तर 30 वर्षांच्या पोलीस दलातील नोकरीमध्ये हेमंत यांना 225च्या वर सन्मान प्राप्त झाले आहेत. जटिल गुन्ह्याचा गुंता सोडवणे, गुन्हेगारांना पकडणे, अत्याचाराला बळी पडणार्यांना कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणे यासाठी हे पुरस्कार होते. पण, भारत सरकारच्या ‘राष्ट्रपती शौर्य पुरस्कारा’ने आणि अमेरिकेच्या ‘स्पार्टन पुरस्कारा’ने हेमंत यांना कशासाठी सन्मानित करण्यात आले होते?
तर, दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला. मुंबई पोलिसांनी जिवाची बाजी लावत मुंबईला वाचवले. पाकपुरस्कृत दहशतवादी कसाबला पकडताना तुकाराम ओंबळे यांनी हौतात्म्य पत्करले. पण, त्याआधी कसाब ज्या वाहनात होता, त्या वाहनाचा चालक आणि कसाबचा दहशतवादी साथीदार अबु तो वेगाने वाहन चालवत होता. दहशतवाद्यांनी कारवाईसाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलीस अधिकार्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. या दहशतवाद्यांना थांबवणे आवश्यक होते. त्यावेळी मुंबई पोलिसातील शूर पोलीस अधिकारी हेमंत अनंत बावधनकर यांनी क्षणात निर्णय घेतला. अचूक निशाणा साधत अबू याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. दहशतवादी अबू मेला, गाडी थांबली. कसाबला जिवंत पकडून मुंबई पोलिसांनी पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुखवटा फाडला. जिवाची पर्वा न करता, अत्यंत निर्णायक क्षणी योग्य, अचूक निर्णय घेऊन देश, समाजाचे रक्षण केले. म्हणून हेमंत यांना भारत सरकारने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेनेही गौरवले.
अर्थात, हेमंत यांच्यासाठी त्यांच्या नामदेव-शिंपी समाजासाठी नव्हे, समस्त भारतीयांसाठी हा गौरव अभिमानास्पद आणि आनंदाचा होता. मात्र, हेमंत यांना त्याक्षणी बाबांची म्हणजे, अनंत बावधनकर यांची आठवण येत होती. अनंत हे अत्यंत देशप्रेमी, देशनिष्ठा असलेले नागरिक. देशाची सेवा करता यावी म्हणून ते सैन्यात भरती झाले होते. मात्र, न टाळता येणार्या कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना घरी परतावे लागले होते. मात्र, ते आपल्या मुलांना नेहमी सांगत की, “कोणताही विचार कराल, काम कराल, तर ते देशहिताचे असावे, देश समाजाच्या कल्याणाशी आणि सुरक्षिततेशी कोणतीच तडजोड नको.” ते हेमंत यांना म्हणत, “मला देशाच्या सीमेवर जाऊन शत्रूला मारुन देशाचे रक्षण करण्याची इच्छा होती. ती अपूर्ण राहिली. पण, तू ती पूर्ण कर.” देशाच्या सीमेवर जाऊन शत्रूचा समाचार हेमंत यांना घेता आला नाही. मात्र, आपल्या देशात घुसणार्या पाकिस्तानच्या नराधम दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे कार्य हेमंत यांनी केले. आज बाबा असते तर? त्यांचे स्वप्न एकप्रकारे पूर्ण झाले, असे हेमंत यांच्या मनात येत होते. शुरता, विरता आणि नीतिमत्ता ओढून ताणून आणता येत नाही. ती रक्तातच असावी लागते आणि हेमंत यांच्या रक्तातच ती शूरता आणि विवेकी नीतिमत्ता होती.
मूळचे गुहागरचे असलेले नामदेव-शिंपी समाजाचे अनंत आणि सुलभा बावधनकर या दाम्पत्याला एकूण चार अपत्य. त्यापैकी एक हेमंत. अनंत हे ‘बेस्ट’ चालक म्हणून नोकरी करायचे, तर सुलभा गृहिणी. 70चे दशक असावे. गिरगाव परिसरात काही दंगा झाला. आग लागली. अग्निशमन दलाची गाडी आली. मात्र, जमावाने अग्निशमन दलाची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाडी तोडू पाहणार्या त्या समाजकंटकांना अडवत अनंत यांनी अग्निशमन गाडीचा ताबा घेतला आणि वेगाने गाडी चालवत गाडी त्यांनी पोलीस स्थानकाबाहेर उभी केली. हे अतुलनीय धैर्य आणि अचूक निर्णय होता. अनंत यांचे सर्वच स्तरावर कौतुक करण्यात आले. त्यावेळी अनंत म्हणाले, “यात काय मोठेसे? अग्निशमन दलाची गाडी सार्वजनिक संपत्ती आहे. देशाची संपत्ती आहे. भारतीय नागरिक म्हणून या संपत्तीचे जतन करणे, माझे कर्तव्य आहे.” तर अशा बाबांचे सुपुत्र हेमंत बावधनकर.
पदवीधर झाल्यानंतर हेमंत यांनी ‘एमपीएससी’ परीक्षा देण्यास सुरुवात केली. पण, पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले. आपण अनुत्तीर्ण झालो, बाबांना काय सांगायचे? मात्र, त्यांच्या बाबांना कळले आणि ते म्हणाले, “हरकत नाही. तू प्रयत्न कर. नक्की यश मिळेल. मला तुला वर्दीमध्ये (पोलिसांच्या गणवेशामध्ये)पाहायचे आहे.” बाबांचा शब्द प्रमाण मानून हेमंत यांनी तिसर्यांदा ‘एमपीएससी’ची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले. पोलीस अधिकारी म्हणून नोकरीवर रूजू झाले.
सध्या नोकरीतून निवृत्त असलेले हेमंत म्हणतात की, “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजे, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्या दुष्टप्रवृत्तींचा नायनाट करणे. मला वाटते की, दुर्जंनावर नियंत्रण ठेवणे याबाबत पोलीस खाते दक्ष असते. मात्र, सज्जनांचे रक्षण समाजाकडून व्हावे, सज्जनशक्तीमध्ये ती ताकद निर्माण व्हावी, त्यासाठी कायदा-सुव्यवस्थेबाबत तरूणाईमध्ये आणि शोषित, वंचित घटकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी मी सध्या काम करत आहे. देशाच्या कल्याणासाठी मी खारीचा वाटा उचलत आहे.” निवृत्तीनंतरही समाज आणि देशासाठी कार्यरत असणार्या हेमंत अनंत बावधनकर यांच्या शूरतेला आणि समाजनिष्ठेला प्रणाम!