कास्पियन समुद्राच्या काठी

Total Views |
 
Caspian Sea
 
तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बर्डीमुखामेदोव्ह यांच्या अदूरदर्शीपणामुळे रशियाबरोबरचा व्यापार धोक्यात आला आहे. सामान्य जनतेची अवस्था मुळातच अत्यंत दरिद्री आहे. कारण, देशाच्या उत्पन्नापैकी मोठा हिस्सा राजकारणी व हितसंबंधी लोकांच्या खिशात जातो. अशा स्थितीत नैसर्गिक वायूचा व्यापारही जर मंदावला, तर अवस्था आणखीच बिकट होईल.
 
आपल्या भारत देशाच्या वायव्य दिशेला पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या वायव्येला आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानच्याही वायव्येला आहे तुर्कमेनिस्तान. पूर्वी म्हणजे जेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे पंजाब, सिंध आणि गांधार होते, तेव्हा भारताची सरहद्द तुर्कमेनिस्तानला भिडलेली होती. पंजाब, सिंध, गांधार हिंदू होते. म्हणूनच ते भारताचा भाग होते, हे वेगळे सांगायला नकोच. प्रथम ते हिंदुत्वापासून दूर झाले आणि मग हिंदुस्थानपासूनही वेगळे झाले. ‘धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर’ हा सिद्धांत कुणाला आवडो अगर न आवडो, इतिहासाने तोच खरा असल्याचे दाखवून दिले आहे.
 
असो. तर अफगाणिस्तानच्या पलीकडे असलेला तुर्कमेनिस्तान देश कास्पियन समुद्रापर्यंत पसरलेला आहे. त्याच्या वाळवंटी प्रदेशाला म्हणतात ‘काराकुम वाळवंट.’ कास्पियन समुद्र हा सर्व बाजूंनी जमीन असलेला बंदिस्त समुद्र आहे. त्याच्या पलीकडे युरोप खंड सुरु होतो. व्होल्गा ही प्रसिद्ध नदी कास्पियन समुद्रात विलीन होते. पण, या झाल्या कास्पियन समुद्राच्या उत्तर तीरावरच्या गोष्टी. त्याच्या दक्षिण तीरावर आहे काराकुम वाळवंट आणि या वाळवंटाखाली दडलाय भरपूर नैसर्गिक वायू.
 
नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे हे तुर्कमेनिस्तानचे वैभव आहे. अलीकडच्या काळात नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून वापर जास्त प्रमाणात होऊ लागला आहे. हा वायू मुबलक उपलब्ध आहे. त्यामुळे तो तुलनेने स्वस्त आहे आणि अर्थातच महागड्या खनिज तेलाला चांगला पर्याय आहे. त्यामुळे याचा वापर सर्वत्र वाढत्या प्रमाणात होत आहे. वायू निर्यात करण्यासाठी तुर्कमेनिस्तानने आपल्या प्रदेशातून रशिया आणि इराण या देशांकडे मोठमोठे नळ टाकले आहेत. वायू वाहून नेणारे हे नळ जमिनीत बर्‍याच खोल म्हणजे 10 ते 15 फूट किंवा त्याहीपेक्षा जास्त खोल टाकले जातात. त्यामुळे मग त्या नळांच्या वर जमिनीच्या पृष्ठभागावर शेती किंवा इतर मानवी व्यवहार करायला कसलीही अडचण येत नाही.
 
आपण घरात स्वयंपाकासाठी जो वायू वापरतो त्याला लिक्विड पेट्रोलियम गॅस-एल.पी.जी. असे म्हणतात. म्हणजे तो सिलिंडरमध्ये द्रवरूपात असतो. आपण सिलिंडरची चावी सुरू केली की तो द्रवरूपातून वायुरूपात रूपांतरित होऊन शेगडीकडे प्रवाहित होऊ लागतो. आपण चावी बंद केली की ही प्रक्रिया थांबते. वायू साठवण्याची, स्टोअर करण्याची ही सोय हे पेट्रोलियम वायूचे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
 
नैसर्गिक वायूमध्ये ही सोय नाही. म्हणजेच तो सिलिंडर किंवा अन्य कशातही साठवता येत नाही. तो एकतर वापरावा लागतो, नाहीतर चक्क जाळून संपवावा लागतो. म्हणून तर नैसर्गिक वायूच्या खाणींची खूण म्हणजे एक जळती मशाल असते. खाणीतून प्रचंड वायू निघत असतो. तो सगळाच्या सगळा नळाद्वारे इतरत्र पोहोचवणे अशक्य असते. मग कृत्रिम मशाल बनवून तो जाळून टाकण्यात येतो. अशा मशाली खूप लांबून दिसतात. आपणही अशा मशाली प्रत्यक्षात किंवा चित्रपट-दूरदर्शनवर पाहिल्याच असतील.
 
तुर्कमेनिस्तान आणि त्याच्या अवतीभवतीचे देश म्हणजे ताजिकीस्तान, उझबेकिस्तान, किरगिजिस्तान आणि कझाकस्तान. या सगळ्याच तुर्कवंशी देशांमध्ये गेल्या दशक-दीड दशकात तेल किंवा नैसर्गिक वायूचे मोठाले साठे सापडले आहेत. हे देश म्हणजे सगळ्या तुर्कांची मूळ भूमी. तुर्क टोळ्या पश्चिमेकडे सरकत-सरकत अनातोलिया भागात जाऊन मोठ्या प्रमाणात वसल्या. इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबस्तानात इस्लामचा उदय झाला. इस्लामी अरब धर्मप्रसारासाठी बाहेर पडल्यावर लगेचच त्यांचा संघर्ष अनातोलियातल्या तुर्कांशी सुरु झाला. कारण, अरबस्तानच्या उत्तरेलाच अनातोलिया आहे. अरबांनी तुर्कांना जिंकून गुलाम बनवले आणि इस्लामीही बनवले. त्यामुळेच पुढे अनातोलियाचा तुर्कस्तान झाला. पण, ती तुर्कांची मूळ भूमी नव्हे.
 
अनातोलियातल्या तुर्कांना अरबांनी साधारण सातव्या-आठव्या शतकातच इस्लामी बनवले. पण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान इत्यादी भागातल्या तुर्की टोळ्यांनी इसवी सनाच्या सुमारे 14व्या शतकात इस्लाम स्वीकारला. मग तोपर्यंत त्यांचा धर्म कोणता होता? अनेक तुर्क टोळ्या बौद्ध होत्या, तर अनेक तुर्क टोळ्यांमध्ये त्यांची पारंपरिक उपासना पद्धती होती. हे झाले पाश्चिमात्य पंडितांनी केलेले वर्णन. आपल्या हिंदू इतिहास परंपरेनुसार, गांधार देशापासून थेट रशियापर्यंत एकेकाळी शैव पंथाचा फार मोठा प्रभाव होता. पुढे या शैवांमध्ये अनेक तांत्रिक पंथ निर्माण झाले आणि यांच्या गूढ उपासनांमुळे ते धर्माच्या मुख्य धारेपासून दूर होत गेले. आणखी पुढच्या काळात याच लोकांपैकी अनेकांनी बौद्ध मताचा स्वीकार केला. परंतु, पुढच्या काही शतकांमध्ये बौद्ध उपासनेतही तांत्रिक संप्रदाय निर्माण होऊ लागले. अखेर सगळ्यांवरच इस्लामचा वरवंटा फिरला. पुढे 16व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत हिंदुस्थानवर सत्ता गाजवणारे मुघल हे या मध्य आशियातले उझबेगी तुर्क होते, अनातोलियातले तुर्क नव्हे.
 
परंतु, रोमन साम्राज्यानंतर त्याच्याचप्रमाणे जगाच्या फार मोठ्या भागावर साम्राज्य निर्माण करणारे सेल्जुक तुर्क आणि त्यांचे उस्मानी साम्राज्य ‘ऑटोमन एम्पायर’ हे नाम अनातोलियातले म्हणजे तुर्कस्तानमधले होते. सेल्जुक तुर्क एवढे प्रबळ झाले की, त्यांनी आपले मालक अरब यांनाच जिंकून टाकले. इस्लामचा सर्वोच्च धर्मगुरु खलिफा याची राजधानी अरबस्तानातल्या बगदादहून अनातोलियातल्या इस्तंबूलला गेली. हे उस्मानी साम्राज्य पुढे आधुनिक युरोपीय सत्रांविरुद्ध निष्प्रय होत गेले, तरी 1918 सालापर्यंत टिकून होते. मध्य आशियातले तुर्क मात्र मागासलेलेच राहिले आणि साधारण 1890 सालच्या अलीकडे-पलीकडे रशियन सम्राटाचे मांडलिक बनले. रशियाच्या झारांना त्यांच्यानंतर अफगाणिस्तानही जिंकायचा होता आणि अखेर हिंदुस्थानपर्यंत पोहोचायचे होते. पण, हिंदुस्थान तर अगोदरच इंग्रजांनी जिंकला होता. त्यांना रशियन अस्वलाने अफगाणिस्तान घशात घालणे नको होते. म्हणून इंग्रजांनी हरप्रयत्न करून अफगाणिस्तानला भारत आणि रशिया यांच्या दरम्यान एक कीलक राष्ट्र-बफर स्टेट-बनवून ठेवला होता. 19व्या शतकातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात ब्रिटन-रशिया यांच्यातल्या या डावपेचांना ‘द ग्रेट गेम’ असे नाव आहे.
 
पुढे रशियात साम्यवादी राजवट सुरु झाल्यावर हे तुर्क देश सोव्हिएत रशियन संघातले प्रजासत्ताक सदस्य प्रांत बनले. ही नावे नुसती कागदावर, प्रत्यक्षात झार राजांनंतर आता ते लेनिन, स्टॅलिन, ब्रेझनेव्ह वगैरे झोटिंगशहांचे गुलाम बनले. इतरत्र मुसलमान सर्वांना डोक्याला ताप बनतात. पण, साम्यवादी मात्र त्यांना त्यांचे बाप बनून रगडून काढताना दिसतात. साम्यवादी रशिया, चीन अशा देशांमध्ये मुसलमानांचा फुटीरपणा अजिबात खपूवन घेतला जात नाही. असेच पाहायला मिळते. चीनने उघूर मुसलमानांना ठेचून काढले आहे. रशिया आता साम्यवादी नाही. पण, केजीबीच्या तालमीत तयार झालेल्या पुतीन यांनी चेचन मुसलमानांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी!
 
1991 साली सोव्हिएत रशिया मोडीत निघाला. त्याच्या मांडलिक प्रजासत्ताकांनी भराभर आपले स्वातंत्र्य जाहीर केेले. त्यापैकीच तुर्कमेनिस्तान हा एक देश. डिसेंबर 1991 साली तुर्कमेनिस्तान हा स्वतंत्र देश बनला. त्याच्या नागरिकांना ‘तुर्कमेन’ असेच म्हणतात आणि त्यांची भाषाही ‘तुर्कमेनी’ याच नावाने ओळखली जाते. अश्काबाद ही राजधानी असलेल्या तुर्कमेनिस्तानचे क्षेत्रफळ आहे साधारण 4 लाख, 88 हजार चौरस किमी म्हणजे आपल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांपेक्षा थोडा मोेठा. आणि लोकसंख्या किती आहे माहीत आहे? सुमारे 50 लाख! म्हणजे मुंबई शहराच्याही निम्मी!
 
साम्यवादी राजवट कोसळल्यावर पूर्व जर्मनीच्या एरिक होनेकर, पोलंडच्या जनरल यारूझेल्स्की किंवा रुमेनियाचा निकोलाय चिसेस्कू हे सत्तेवर राहू शकले नाहीत. जनतेने त्यांना हाकलून लावले. पण, तुर्कमेनिस्तानात असे घडले नाही. कालपर्यंत मॉस्कोचा सुभेदार म्हणून काम पाहाणारा सपरमुरात नियाझोव्ह हाच स्वतंत्र तुर्कमेनिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला. आता त्याच्याभोवती खुशमस्कर्‍यांइतकाच वेगवेगळ्या युरोपीय, अमेरिकन आणि रशियन कंपनी प्रतिनिधींचा घोळका जमू लागला.
 
या सगळ्यांना तुर्कमेनिस्तानच्या विकासाची म्हणजेच तिथल्या सर्वसामान्य माणसांची फिकीर असण्याचे कारण नव्हते. तुर्कमेनिस्तानमधली नाना प्रकारची व्यापारी कंत्राटे आपल्या पदरात पाडून घेणे आणि त्यासाठी नियाझोव्हला भरपूर चढवणे, हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. ते साध्य करताना त्यांनी नियाझोव्हला इतका चढवला की, त्याचा सगळा कारभार हळूहळू स्टॅलिनच्या वळणावर जाऊ लागला. त्याने स्वतःला तहहयात अध्यक्ष घोषित केले आणि ‘तुर्कमेनबाशी’ ही पदवी धारण केली. या शब्दाचा अर्थ ‘राष्ट्रपिता’ शिवाय त्याने वर्षातली महिन्यांची नावे बदलून ती स्वतः आणि स्वतःची आई यांच्या नावावरून ठेवली. राजधानी अश्काबादमधल्या मुख्य चौकात 250 फूट उंचीच्या चबुतर्‍यावर त्याने स्वतःचा 36 फूट उंच पुतळा उभारला. कितीही नाटके केली, तरी मृत्यूसमोर कुणाचेच काही चालत नाही. 2006 झाली नियाझोव्हची 15 वर्षांची राजवट मृत्यूने संपवली.
 
आता गुरबांगुली बर्डीमुखामेदोव्ह हे राष्ट्राध्यक्ष आहेत. नियाझोव्ह यांच्या अनेक लेकावळ्यांपैकीच (दासीपुत्र) ते एक आहेत, असे म्हणतात. एकंदर कारभारात ते नियाझोव्ह यांचाच कित्ता चालवत आहेत. नैसर्गिक वायूचे जगातील चौथ्या क्रमांकाचे साठे तुर्कमेनिस्तानात आहेत. त्यामुळे अलीकडेच, जगभरच्या अनेक नामवंत ऊर्जा कंपन्यांची एक महत्त्वपूर्ण व्यापारी बैठक अश्काबादमध्ये झाली. बैठकीचे उद्घाटन राष्ट्राध्यक्ष करणार, असे घोषित झाले. प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्षांचा एक प्रचंड मोठा रंगीत फोटो बैठकीत आणण्यात आला आणि त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला.
 
अगोदर सांगितल्याप्रमाणे रशिया आणि इराणशी होणार्‍या नैसर्गिक वायू व्यापारातून तुर्कमेनिस्तानला फार मोठे उत्पन्न मिळते. पण, बर्डीमुखामेदोव्ह यांच्या अदूरदर्शीपणामुळे रशियाबरोबरचा व्यापार धोक्यात आला आहे. सामान्य जनतेची अवस्था मुळातच अत्यंत दरिद्री आहे. कारण, देशाच्या उत्पन्नापैकी मोठा हिस्सा राजकारणी व हितसंबंधी लोकांच्या खिशात जातो. अशा स्थितीत नैसर्गिक वायूचा व्यापारही जर मंदावला, तर अवस्था आणखीच बिकट होईल.
 
तुर्कमेनिस्तानचा एक जुन्या काळातला कवी मख्तुम कुली याने आपल्या देशाचे वर्णन, चंगेजखानाच्या स्वार्‍यांमुळे ’उद्ध्वस्त आणि बेचिराख झालेला देश’ असे केले होते.
 
आज तुर्कमेनिस्तान त्याच मार्गावर चाललेला दिसतोय. त्याचे कारण मात्र कुणा परकीयाची स्वारी नसून, स्वकीयांचे अयोग्य राज्य हे आहे.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.