धुके, धुरके व धूलिकणांमुळे महामुंबईची धूळधाण

    03-Jan-2025
Total Views |
 
Mumbai smog
 
धुके, धुरके व धुलिकणांमुळे महामुंबईत एकूणच दृश्यमानता कमी झाली असून, नागरिकांना सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या त्रासांनी हैराण केले आहे. तेव्हा, मुंबईचेही दिल्लीसारखे ‘गॅस चेंबर’ होणार नाही ना, अशी भीती व्यक्त होताना दिसते. त्यानिमित्ताने महामुंबईतील वायूप्रदूषणाची विदारक स्थिती आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
बईची हवा सर्वसाधारणपणे ‘साधारण’ दर्जाची असली, तरी ती अनेक ठिकाणी ‘खराब’ दर्जाची आढळली आहे. या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी ही हवा ‘खराब’ वा ‘फार खराब’ दर्जाची आढळत आहे. गेल्या वर्षी याच डिसेंबर महिन्यातील हवा या वर्षीपेक्षा चांगली होती. ज्या ठिकाणी हवा सध्या ‘खराब’ आढळत आहे, त्याचठिकाणी ती समाधानकारक, चांगली व थोडे दोन-तीन दिवस ‘खराब’ आढळली होती. (खालील तक्त्यात तुलनात्मक स्थिती दर्शविली आहे).
 
महामुंबईत या आठवड्यात आकाशात धुराचे जाड असे ढग निर्माण झालेले दिसून आले. ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या निरीक्षणाप्रमाणे, सर्वत्र साधारण दर्जाची हवा आढळली आहे. दि. 27 डिसेंबर रोजी हवा सरासरी ‘एक्युआय’ 151 युजी प्रती घनमी आढळली. (म्हणजे साधारण दर्जाची)
 
सध्या मुंबई महानगरपालिकेतर्फे 25 ठिकाणी ‘एक्युआय’ निरीक्षण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रांतून हवेचा दर्जा नियमितपणे तपासला जातो. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’तर्फे आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटरॉलॉजी’तर्फे रोज काही केंद्रांमधून हवेचे निरीक्षण केले जाते व त्याप्रमाणे मुंबईतील या विशिष्ट ठिकाणी ‘खराब’ वा ‘फार खराब’ दर्जाची आढळत आहे. एनजीओ वातावरण संस्थेच्या मालकाने सुरू केलेले भगवान केसभट याच्या म्हणण्याप्रमाणे, “मुंबईतील हवा निरीक्षणाची केंद्रे ही अपुरी आहेत. अनेक ठिकाणी बांधकामे सुरु झाली आहेत. त्या व इतर ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासली जात नाही. अशा ठिकाणी हवा तपासण्याची केंद्रे मनपाने वाढवावी, ज्यांच्या मदतीने सर्व ठिकाणांचा हवेचा दर्जा तपासता येईल.” मनपाच्या उपआयुक्त (पर्यावरण खाते) एस. व्ही. परकाळे या अधिकार्‍यांनी यावर काहीच भाष्य केले नाही.
काही कंत्राटदारांनी धुळीच्या नियंत्रणाकरिता बांधकाम स्थळी पाणी शिंपडले नाही, म्हणून अशा कंत्राटदारांकडून मनपाने रु.52 हजार दंड वसूल केला. मनपातर्फे आतापर्यंत 129 रस्ते व 249 किमी रस्त्यांवर पाणी शिंपडण्याचे काम होत आहे, ज्यातून धुळीवर ती हवेत उडण्याचे व वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल.
 
मुंबईतील हवा 201 ते 300 या दर्जाची म्हणजे, ‘खराब’ झाल्यामुळे नागरिकांच्या श्वासोच्छ्वासाच्या म्हणजे दमा रोगाच्या, सर्दी-खोकल्याच्या तक्रारीमध्ये भर पडते व ते बेजार होतात. मुंबईतील बांधकामामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने कडक नियम बनविले आहेत. हे नियम न पाळल्यास 20 लाखांपर्यंत दंड केला जाईल.
 
मुंबईत सध्या हजारो बांधकामे वा दुरुस्ती कामे होत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. ही बांधकामे व दुरुस्ती कामे करणार्‍यांवर त्या भागात प्रदूषण होऊ नये, म्हणून जबाबदारी आहे. या निर्माणाधीन बांधकाम प्रकल्पातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित सुरु होत आहे. ‘एमएमआरडीए’च्या सर्व विद्यमान व भविष्यातील प्रकल्पांसाठीही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाणार आहेत. या तत्त्वांची जबाबदारी अभियंत्यावर राहील व त्यांनी या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणीच्या संदर्भातील नोंदी ठेवून, त्यांना प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा लागेल. या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने कंत्राटदारांसाठी कडक दंड निश्चित केला आहे. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास रु.पाच लाख दंड होईल. पुन्हा उल्लंघन झाल्यास दंड 20 लाख रुपयांपर्यंत वाढविला जाईल.
 
प्रमुख उपाययोजना कोणत्या?
 
1. धुळीवर नियंत्रण मिळविणे
 
महामुंबईत बांधकाम सुरु असलेल्या सर्व ठिकाणी वॉटर स्प्रिन्कलर्स आणि फॉगिंग मशीन तैनात करणे आवश्यक आहे. मातीची वाहतूक करताना आणि बांधकाम साहित्याच्या साठ्यावर पाण्याची नित्य फवारणी करणे. तसेच प्रकल्प परिसरात यांत्रिक शक्तीवर चालणार्‍या सफाई यंत्रांचा वापर करणे देखील फायद्याचे ठरु शकते.
 
2. हवेच्या दर्जाकडे लक्ष ठेवणे आणि व्यवस्थापन, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करणे. प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्वसमावेशक निरीक्षण व अहवाल यंत्रणा राबवायला हवी.
 
3. वाहनांचे नियमन आणि बांधकामातून निर्माण होणार्‍या कचर्‍याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे. अनधिकृतपणे शहरात कुठेही असा मलबा टाकण्यास प्रतिबंध करावा. धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व पाडकाम करणे, कचर्‍याच्या वाहतुकीचे योग्य नियमन करणे, बांधकाम साहित्याची वाहतूक करणार्‍या वाहनांसाठी योग्य झाकणे आणि परवान्यासह मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे. प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा जाळण्याला देखील पूर्ण प्रतिबंध करण्यात आला आहे.
 
2024 या वर्षात वायू प्रदूषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावण्याचे प्रमाण देखील वाढले असून, गेले वर्षभर प्रदूषणाचा आलेख चिंताजनक वाढत आहे. बांधकाम, पाडकाम, रेडीमिक्स काँक्रीट प्लांट, वाहतूककोंडी, बेकर्‍या आणि स्ट्रीट फूडमुळे वायू प्रदूषणात वाढ होत आहे. मनपा आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. परंतु, त्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी होत नसल्याने प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांना संपूर्णपणे यश मिळताना दिसत नाही.
 
मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाल्याची दखल उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे आणि मनपा व प्रदूषण मंडळांना यासंदर्भात खडसावले आहे. यानंतर बांधकामे, पाडकामे इत्यादींची पाहणी करण्यात आली व मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
दक्षिण मुंबईत कुलाबा, माजगाव, भायखळा, वरळी परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढल्याने नागरिकांना आरोग्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्व उपनगरातील शिवडी, कुर्ला, चेंबूर, शिवाजीनगर तर पश्चिम उपनगरात बीकेसी, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि अंधेरी येथे प्रदूषण वाढलेले आहे. ज्या विकासकामांमुळे व बांधकाम, पाडकामे कामांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे समजल्याने मार्गदर्शक तत्त्वे आणण्यात आली व त्यांची अंमलबजावणी होणे जरुरीचे ठरले.
 
अशी आहेत काही मार्गदर्शक तत्त्वे...
 
1. नियोजित असलेल्या कमीतकमी 20 हजार चौ. मी बांधकाम प्रकल्प क्षेत्रामधील जागेत कॅप्टिव्ह रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी दोन हजार चौ. मी. राखीव जागेची तरतूद करणे आवश्यक आहे.
 
2. अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांना पुढील तीन महिन्यांच्या काळात पूर्णत: बॉक्स टाईप आच्छादन करणे आवश्यक असून, त्यासाठी 20 लाख रुपयांची बँक हमी प्रदूषण मंडळाकडे जमा करण्याची आवश्यकता आहे. बांधकाम प्रकल्प 70 टक्के पूर्ण झाल्यास तेथील रेडीमिक्स प्लांट स्थलांतरित करणे आवश्यक राहील.
 
धूळ नियंत्रणासाठी शहरात रस्तेधुलाई.
 
रस्ते पदपथ स्वच्छतेसाठी ‘ई-स्विपर’ यंत्राचा वापर.
 
खुल्या जागेत, बांधकामाच्या साहित्यावर नियमितपणे पाणी फवारणी होत असल्याची खात्री केली जात आहे.
 
विना परवाना राडारोडा वाहतूक करणार्‍या वाहनांवर तसेच, आच्छादन असल्याची खात्री करणे. तसेच, सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करणार्‍या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
 
वायूप्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईतील 24 वॉर्डमधील 868 बांधकाम प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. त्यातील नियमांचे उल्लंघन केलेल्या 28 बांधकामांना लेखी सूचना देण्यात आली.
 
मुंबईवर विषारी धुरके
 
धुके, धुरके व धूलिकणांमुळे मुंबईत दि. 27 डिसेंबर रोजी खूपच दृश्यमानता खालावली होती. धुरक्याने मुंबईची कोंडी झाली होती. नागरिकांना खोकल्याची उबळ येत होती. दमेकर्‍यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. हवेचा दर्जा घसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत होता.
 
मुंबईतील 24 वॉर्डमधील ‘ट्रक माऊन्टेड फॉग मिस्ट कॅनॉन’ संयंत्राद्वारे दोन सत्रांमध्ये पाणी फवारणी केली जात आहे.
 
स्प्रिंकलर्सचा वापर
 
बांधकामाच्या ठिकाणी धुळीचे कण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा राडारोडा व अन्य साहित्यावर सातत्याने व न चुकता पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. स्प्रिंकलर्स आणि स्थिर व फिरत्या ‘अ‍ॅन्टी स्मॉग गन’चा वापर याकामी केला जात आहे. बांधकाम प्रकल्पास्थळी बाहेर पडण्याच्या ठिकाणी वाहनांची चाके धुण्याची सुविधा बंधनकारक करण्यात आली आहे.
 
मनपाकडून वरीलप्रमाणे स्वच्छतेकरिता व प्रदूषण नियंत्रणाकरिता अनेक प्रयत्न होत आहेत. परंतु, असे प्रयत्न सातत्याने करणे जरुरी आहे.
 
 
चॅर्ट 
अच्युत राईलकर