मुंबई : २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात अगदी दमदार झाली आहे. नव्या वर्षात विविध विषयांवर आधारित मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड अशा विविध भाषांमधील भारतीय चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. २०२५ मध्ये काही नवे चित्रपट तर काही चित्रपटांचे सीक्वेल्स भेटीला येणार आहेत. या वर्षात नवे कोणते चित्रपट येणार याकडे लक्ष देण्यापूर्वी जरा भूतकाळात जाऊन २०२४ मध्ये डोकावूयात. २०२४ हे वर्ष खऱ्या अर्थाने हॉर कॉमेडी चित्रपटांनी गाजवले. ‘स्त्री २’, ‘मुंज्या’ या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच घेतले होते. मॅडॉक फिल्म्सने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक लक्षात घेता हॉरर कॉमेडी चित्रपट अधिक आवडत असल्याचे लक्षात घेत २०२५ आणि आगामी वर्षांमध्ये मध्ये तब्बल ८ नव्या चित्रपटांची मेजवानी ते सादर करणार आहेत. जाणून घेऊयात मॅडॉक फिल्म्सच्या या चित्रपटांबद्दल....
२०१८ मध्ये मॅडॉक फिल्म्सने श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडी चित्रपट तयार केला होता. याच पठडीत येणारे ‘भेडिया’, ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री २’ असे चित्रपट तयार करत त्यांनी हॉरर कॉमेडी युनिवर्स तयार केले. दरम्यान, मॅजॉक फिल्म्सने २०२५ ते २०२८ या चार वर्षांत ते नवे कोणते चित्रपट घेऊन येणार आहेत याची यादी त्यांनी जाहिर केली आहे.
मॅडॉक फिल्स्मचे आगामी चित्रपट पुढीलप्रमाणे :
थामा- दिवाळी- २०२५
शक्ती-शालिनी - ३१ डिसेंबर २०२५
भेडिया २ - १४ ऑगस्ट २०२६
चामुंडा - ४ डिसेंबर २०२६
स्त्री ३- १३ ऑगस्ट २०२७
महा मुंज्या - २४ डिसेंबर २०२७
पहला महायुद्ध- ११ ऑगस्ट २०२८
दुसरा महायुद्ध - १८ ऑक्टोबर २०२८
मिळालेल्या माहितीनुसार, ‘थामा’ चित्रपटात आयुष्यमान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, अपारशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तर ‘स्त्री ३’ मध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी हे कलाकार तर असतीलच पण चित्रपटात एका प्रसंगात अक्षय कुमारची झलक दाखवल्यामुळे स्त्री चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमारही असणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. तर ‘मुंज्या २’ मध्ये अभय वर्मा, शर्वरी वाघ हे कलाकार तर असतीलच याशिवाय अजून कोणते कलाकार झळकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘भेडिया २’ मध्ये वरुण धवन तर असेलच पण त्याच्याशिवाय अजून कोणते कलाकार असतील ते लवकरच कळणार आहे.
याशिवाय मॅडॉक फिल्म्स ऐतिहासिक चित्रपट छावा देखील भेटीला घेऊन येणार आहेत. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि पराक्रम दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले असून अभिनेता विकी कौशल चित्रपटात छत्रपती संभाजदी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या पुढच्या ४ वर्षांच्या मनोरंजनाची तजबीज मॅडॉक फिल्म्सने केली असून भारतीय चित्रपटसृष्टीतील हॉरर कॉमेडी युनिवर्स एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. दरम्यान, या भव्य घोषणेवर प्रतिक्रिया देताना, मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजान म्हणाले की, “मॅडॉकचा हेतू नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आहे. आम्ही प्रेक्षकांच्या भावनांना भिडणारी पात्रे निर्माण केली आहेत, जी भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशात रुजली आहेत. हा दृष्टीकोन आमच्या कथा केवळ भावनिकच नव्हे, तर अर्थपूर्ण देखील बनवतो. आम्हाला असं एक सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करायचं आहे ज्यामुळे अविस्मरणीय पात्रं आणि त्यांचे किस्से नव्या उंचीवर पोहोचतील”.