सावित्रीआईंच्या नेतृत्वात महिला राज्याकडे आपली वाटचाल सुरु!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पुतळ्यासोबतच विचारांचे स्मारक तयार करणार
03-Jan-2025
Total Views |
सातारा : सावित्रीआईंच्या नेतृत्वात महिला राज्याकडे आपण वाटचाल करत आहोत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. बुधवार, ३ जानेवारी रोजी सातारा येथे आयोजित सावित्रीमाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, अतुल सावे, शंभुराज देसाई यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज कुणीही एका भाषणात किंवा एका कार्यक्रमात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव करु शकत नाही. पण थोर माणसांचे कार्य कधीच संपत नसते. त्या त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचे असते. स्मारक हे केवळ पुतळ्यापुरते मर्यादित नाही. आपण अनेक पुतळे करतो. तिथे जाऊन त्यांचे स्मरणही करतो. पण पुतळ्यांसोबतच विचारांचेही स्मारक व्हायला हवे.
"तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे स्मारक बनवण्याची घोषणा केली होती. त्याचा आराखडा तयार झाला असून आमच्यापुढे त्याचे सादरीकरण झाले आहे. हे स्मारक सावित्रीबाईंच्या प्रतिमेपुरते मर्यादित नसून त्यांचा विचार रुजवून स्वंयपूर्ण महिला तयार करण्यासाठी आम्ही स्मारक तयार करून दाखवू. पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरु होईल. त्यापूर्वी हे स्मारक तयार ठेवले पाहिजे. यासाठी १० एकर जमीन अधिग्रहित करण्यासाठी तात्काळ कारवाई सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
ते पुढे म्हणाले की, "एकीकडे पाच वर्षानंतर सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरु होईल आणि दुसरीकडे देशाच्या लोकसभा आणि विधानसभेत महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्याने ३३ टक्के महिला खासदार आणि आमदार होतील. त्यामुळे आपल्या देशातसुद्धा हळूहळू सावित्रीआईंच्या नेतृत्वात महिला राज्य येण्याकडे आपण वाटचाल करत आहोत."
...त्यावेळी सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण होईल!
"ज्यावेळी महिला आणि मुली सक्षमपणे समाजात वावरताना दिसतील त्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण केले असे आपल्याला म्हणता येईल. सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्तारित स्वरुपात तयार करण्यासाठी सरकारचे प्राधान्य असेल. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावर चालत समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास होईपर्यंत सातत्याने काम करू," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.