जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी पुष्पगुच्छ आणू नये! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना
03-Jan-2025
Total Views |
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील दौऱ्यावेळी कोणतेही अधिकारी पुष्पगुच्छ आणणार नाहीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. गुरुवार, २ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दौऱ्याबाबत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कोणत्याही अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये. तसेच पोलिस दलाकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनेची प्रथाही त्यांच्या दौऱ्यात बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे.