‘सूड सूड’ म्हणालात की, सोड सोड म्हणालात साहेब? आम्हांला वाटले, तुम्ही ‘सूड... सूड... सूड’च म्हणालात. आपल्या पदाधिकार्यांना वाटले की, तुम्ही ‘सोड सोड’ म्हणालात. त्यामुळे पुण्याच्या पदाधिकार्यांनी, मोठ्या संख्येने आपला उबाठा गट सोडला साहेब. साहेब आपले ते पुण्याचे लोक, सूड घेण्यासाठी शिंदेगटात जात आहेत का? ते कोणाचा सूड घ्यायला तिकडे गेले साहेब? हो आपले विश्व प्रवक्ते दूरदृष्टीचे संजय दोनवेळा पुण्यात गेले होते. त्याचा परिणाम हा असा झाला की, आपले लोक शिंदेगटात हौसेने गेली.
तुम्ही पुण्यात भाकरी पण फिरवणार आहात असे म्हटले. साहेब म्हणजे तुमचे नवे काका शरद पवार जशी भाकरी फिरवतात, तसेच आहे का हो? भाकरीबिकरी फिरवून पण, भाकरीवरची तूपरोटी पक्षासाठी काम करणार्या कार्यकर्त्यांला मिळणार नाही, ती तूपरोटी मिळेल केवळ त्यांच्या कन्येला, अशी तरतूद ते करतात. तसेच, तुम्ही पण भाकरी फिरवणार यात कुणालाच संशय नाही. साहेब नुसती भाकरी फिरवून फायदा नसतो. भाकरीचं पीठ, साधन आणि मुख्यतः भाकरी कोण फिरवत, हे पण महत्त्वाचे आहे. तेच न कळल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातच काय, महाराष्ट्रभर पक्षाला गळती लागली. साहेब, दुसरीकडे आपले खंजीर, तलवार, अफजुल्या, औरंग्या हे शब्द आता काही काही कामाचे राहिले नाहीत. आपण आता ते कोणत्या तोंडाने म्हणणार? असे म्हटले तर ‘व्होट जिहाद’ करून, लोकसभेत तुम्हाला जागा मिळवून देणारे तुमचे लाडके मतदार हे अजिबात खपवून घेणार नाहीत. बरं, राम मंदिर किंवा १९९२ सालची दंगल यामध्ये आपण भाजपसोबत राहून हिंदुत्ववादी होतो, याची आठवणही काढायची म्हटले तरी तेच. तुमच्या नव्या मतदारांच्या भावना दुखावतात ना? साहेब महानगरपालिका निवडणुकीमध्ये, सूड घ्या असे म्हणालात. पण, आता अवघ्या महाराष्ट्राचे म्हणणे आहे की सूड नको, विकासाचे आणि प्रगतीचे सुख देणारे सरकार आम्हाला हवे आहे. जे आता आहे. देवाक काळजी साहेब! आता देवाक म्हणजे कोणत्या देवाला काळजी आहे, असे तुम्हांला वाटेल. तर तुमच्या ध्यानीमनी जो आहे, तोच देवा बरं. साहेब एक सल्ला, तुम्ही सूड सूड म्हणता पण, कार्यकर्त्यांना पक्ष सोड सोड असे वाटते. ते तसे नाही, हे सांगण्यासाठी लवकरच फेसबुक लाईव्ह या साहेब!
गांधी फॅमिली की जय...
“गंगेमध्ये डुबकी मारल्याने गरिबी दूर होत नाही,” असे मल्लिकार्जुन खर्गे नुकतेच म्हणाले. खर्गे यांना गंगा नदी म्हणजे, गरिबी हटवण्याची एखादी योजनाबिजना वाटते की काय? त्यांच्याबाबत रामदास आठवले यांनी विधान केले की, ‘खर्गे यांनी गंगेत डुबकी मारली तरी त्यांचे पाप धुवून निघणार नाहीत, इतके ते पापी आहेत.’ अर्थात पाप-पुण्याची व्याख्या ही बदलती आहे. मात्र, दुसर्यांच्या मनाला दु:ख होईल असे वागणे बोलणे, हेसुद्धा पापच आहे आणि ते पाप खर्गेे सातत्याने करत आले आहेत. त्यामुळे खर्गे यांना पापमुक्ती मिळणार नाहीच असे दिसते.
आज २०२५ साली जगभरातून लोक महाकुंभाला हजेरी लावत आहेत. हिंदूंच्या आस्थेशी जोडले जात आहेत. त्यामुळे हिंदू धर्म, रिती, परंपरा, संस्कृती यांचा द्वेष असणार्या, खर्गेंचा गंगा नदीबद्दलचा द्वेष वाढला असणार यात काय नवीन? त्यातच कुंभमेळ्यामध्ये सगळ्या जातीचे लोक, धार्मिक समरसतेच्या बळावर एकत्र आले. गंगेचे स्नान अमुक एक जातीचे लोकच करतात. तमुक जातीच्या लोकांना, स्नान करण्याला बंदी आहे, जातीय विषमता आहे, हे कुंभमेळ्यात दिसत नाही. हेच सत्य पाहून खर्गे बिथरले. हिंदू जर एक झाला, तर मग आपले ‘मोहब्बत’चे म्हणजे खर्या अर्थाने, विद्वेषाचे दुकान कसे चालणार? हे खर्गेंसह राहुल गांधी यांना वाटते. असो, गंगा नदी आणि गरिबी यांचा संबंध लावणार्या खर्गे यांचा, जमिनीस्तराशी काही संबंध उरला नाही. भारतीयांसाठी गंगा ही केवळ वाहत्या पाण्याची एक मोठी नदी नाही, तर भारतीय माणूस हा ‘गंगा मैया’, ‘गंगामाता’ असा भाव ठेवूनच गंगानदीच्या समोर नतमस्तक होतो. अशा गंगास्नानाबद्दल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बाणा दाखवणारे खर्गे हज यात्रा तसेच, चर्चचे मंतरलेले पाणी यावर असेच ज्ञान वाटतील का? छे, तसे केल्यावर पुढचे ज्ञानामृत पाजण्याआधीच, आपले काय होऊ शकते, हे खर्गे यांना माहिती आहे. त्यामुळेच खर्गेंसारखे लोक, त्यांचा द्वेष, मत्सर हिंदूंच्यापुढेच पाजळत असतात. बाकी गांधी घराण्यासमोर लोटांगण घालण्यात अख्खे जीवन घालवणार्यांना, गंगेचे माहात्म्य आणि भारतीयांची श्रद्धा काय कळणार? ‘गांधी फॅमिली की जय’ म्हणत, उरलंसुरलं आयुष्य लाळघोटेपणा करत कुंठाव इतकेच त्यांच्या हातात आहे.
९५९४९६९६३८