नवविधाभक्तीमधील कीर्तनातून भक्ती आणि समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची दृढ इच्छा मनी धरणार्या, अमृता करंबेळकर यांच्याविषयी...
भारतभूमी ही संतांची भूमी म्हणूनच ओळखली जाते. अनेक संतांनी या भूमीवर जन्म घेऊन अलौकिक कार्य केले आहे. भक्ती असो वा समाजप्रबोधन सगळ्यातच संतांचे कार्य हे अद्वितीयच! अनेक संतांनी जनसंवादासाठी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला.‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ हा संतांसाठी फक्त अभंग नव्हता, तर ते जीवनध्येय होते. संतांची ही कीर्तन परंपरा या भारतभूमीमध्ये आजही अव्याहतपणे सुरू आहे.
साधारणपणे कीर्तन म्हटले की, निवृत्तीनंतरचा छंद असा एक भ्रम आढळतो. पण, या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी आज अनेक तरुण कीर्तनकार या संत परंपरेची ध्वजा अभिमानाने खाद्यांवरून मिरवत आहेत. अशाच एक तरुण कीर्तनकार म्हणजे ह.भ.प अमृता आनंद करंबेळकर होय. गोव्यातील फोंडा इथे अमृता यांचा जन्म, एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच आई वडिलांचा हात पकडून मंदिरात जाण्याची सवय अमृता यांना होती. यावेळी मंदिरात असलेल्या भजनांचे सूर अमृता यांना मंत्रमुग्ध करत असत. इयत्ता दुसरीमध्ये असताना अमृता यांनी भजन शिकण्याचा हट्ट पालकांशी केला. सुरुवातीला पालकांनी बालहट्ट असे समजून, फारसे मनावर घेतले नाही. मात्र, जेव्हा अमृता यांची मागणी सातत्याने होऊ लागली. तेव्हा अशी इच्छा मुलीला का व्हावी? या कुतुहलापोटी अमृता यांच्या पालकांनी, अमृता यांना प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प सुहासबुवा वझे यांच्याकडे कीर्तन शिकण्यास पाठवले.
मुळातच असलेली आवड आणि त्याला लाभलेले वझे बुवांचे मार्गदर्शन, यामुळे अमृता यांनी इयत्ता चौथीमध्ये आयुष्यातील पहिले कीर्तन केले. त्यानंतर त्यांचा सुरू झालेला कीर्तनाचा प्रवास अखंड सुरू आहे. सुरुवातीला दोन तीन वर्षे कीर्तनाचे शिक्षण अमृता यांनी वझे बुवांकडे घेतले. मात्र, त्यानंतर शैक्षणिक कारणांमुळे त्यामध्ये खंड पडला. पुढे दहावी झाल्यानंतर ह.भ.प केशवबुवा शिवडेकर बुवा आणि ह.भ.प बुवा यांच्याकडे अमृता यांनी पुन्हा एकदा कीर्तनाचे धडे गिरवले. मात्र, काही कारणास्तव त्यातही खंड पडत होता. मात्र, ध्येयासक्ती अमृता यांना स्वस्थ बसू देईना. अनेकदा त्यांच्या मनात नकारात्मक विचारांचे मोहोळ उठत असत. अशावेळी मनाची उद्विग्नता दूर करण्यासाठी, अमृता यांना आध्यात्मिक साधनेचा उपयोग झाला.
अमृता या दत्त संप्रदायिक असून, त्या अनुग्रहितदेखील आहेत. त्यामुळे उपासनेने त्यांच्या मनाची निश्चलता अखंड राहिली. कितीही खंड पडला तरी, कीर्तनभक्तीवरील त्यांची श्रद्धा सद्गुरूंनी टिपूसभरही कमी होऊ दिली नाही.
पुढे पुणे इथे शिक्षणासाठी आल्यावर संस्कृत विषयामध्ये अमृता यांनी पदवी प्राप्त केली. सध्या त्या संस्कृत विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. कीर्तन आणि संस्कृत हे समांतर चालणारे विषय आहेत. अनेकदा एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी कीर्तनामध्ये, एखादा श्लोक किंवा सुभाषिताचा वापर केला जातो. तसेच, निरनिराळ्या दृष्टांताचा वापरही, सिद्धातांच्या स्पष्टीकरणासाठी होतो. यासाठी आवश्यक असते ते वाचन. वाचनाची ही आवडच या शिक्षणकाळात लागली असल्याचे अमृता सांगतात. आजमितीला अमृता यांनी जवळपास 200च्या आसपास कीर्तने झाली आहेत. उज्जैनमध्येही अमृता यांना सप्ताहासाठीही आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यावरच्या गुरूकृपेचा अनुभव त्यांना अनेकदा आल्याचे त्या आठवणीने सांगतात. कीर्तन शिकताना येत असलेल्या अडचणी, सद्गुरूंसमोर केलेल्या कीर्तनानंतर पूर्ण बंद झाल्याचे अमृता यांनी नमूद केले. दत्त महाराजच आपल्याकडून हे सारे घडवून घेत आहेत, जी संकटे आली ती सारी नशीबाचे भोग म्हणून आनंदाने स्वीकारता आली, यामागे सद्गुरूंची कृपा असल्याचे, अमृता यांनी म्हटले.
कीर्तनाबरोबरच अमृता नाटकांमध्येही काम करतात. इयत्ता सातवीमध्ये असतानाच अमृता यांनी, ‘तुका आकाशाएवढा’ या नाटकामध्ये तुकाराम महाराजांच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच, ‘महिला हौशी नाट्य मंडळा’च्या माध्यमातून संगीत रंगभूमीवरील ‘संगीत सौभद्र’ या नाटकामध्ये, अर्जूनाची भूमिकादेखील अमृता यांनी केली.
अमृता कीर्तनाच्या माध्यमातून संत शिकवण फक्त लोकांना सांगत नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीमध्येदेखील उतरवतात. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये विष्णूदासांचे गुणवैशिष्ट्य वर्णन करताना म्हणतात,
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठिण वज्रास भेदूं ऐसे
मायबापाहूनि बहू मायावंत ।
करूं घातपात शत्रूहूनि । ।
संतांच्या शिकवणीचा धागा पकडून अमृता यांनी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी याचे उत्तम प्रशिक्षण घेतले आहे. “जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन” संत रामदास स्वामींच्या शिकवणीनुसार, अमृता सध्या पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी विद्यालयात बालवाडीतील विद्यार्थ्यांना, संस्कृत शिकवण्याचे कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे त्या संस्कृतचे खासगी शिकवणी वर्गदेखील घेतात. संस्कृतच्या शिक्षणामुळे ज्ञानाचे फार मोठे भांडार उघडले आहे. त्यातील ज्ञान शक्य होईल, तितके समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर कीर्तन करत राहण्याचा मानस अमृता यांनी व्यक्त केला आहे. स्वत:च्या हितासाठी जो वेळीच सावध होतो, तो स्वत: बरोबर समाजाचेदेखील हित साध्य करत असतो. अमृतांचे कार्यही असेच आहे. अमृता यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क)
८७६७०४१४२४