सूर्य व चंद्रलोकातील यशाच्या अभिलाषेनंतर यशेच्छुकाला आकांक्षा आहे, ती ऐश्वर्याचे यश मिळविण्याची! यासाठी मंत्रात भग शब्द आला आहे. ‘यशो भगस्य विन्दतु।’ हे ईश्वरा, मला भगाचे यश लाभो.
यशो मा द्यावापृथिवी यशो मेन्द्रबृहस्पती।
यशो भगस्य विन्दतु यशो मा प्रतिमुच्यताम्।
यशसास्याः संसदोऽहं प्रवदिता स्याम्॥
(सामवेद 611)
अन्वयार्थ
हे परमेश्वरा! (मा) मला (द्यावा-पृथिवी) द्युलोक व पृथ्वी लोकाचे (यशः) यश (विन्दतु) प्राप्त होवो. (मा) मला (इन्द्र-बृहस्पती) चंद्र व सूर्याचे (यशः) यश (विन्दतु) मिळो, प्राप्त होवो. (मा) मला (भगस्य) ऐश्वर्याचे (यशः) लाभो. (यशः) यशाने (मा) माझा (प्रतिमुच्यताम्) त्याग करू नये. (यशसः) याच यशाच्या माध्यमाने (अहम्) मी (अस्याः) या (संसदः) मानव समाजरुपी सभेचा, सभास्थळाचा यशस्वी असा (प्र+वदिता) उत्तम वक्ता (स्याम्) होवो.
विवेचन
द्युलोक, पृथ्वीलोक, सूर्य व चंद्रलोकातील यशाच्या अभिलाषेनंतर यशेच्छुकाला आकांक्षा आहे, ती ऐश्वर्याचे यश मिळविण्याची! यासाठी मंत्रात भग शब्द आला आहे. ‘यशो भगस्य विन्दतु।’ हे ईश्वरा, मला भगाचे यश लाभो. भग म्हणजेच सर्व प्रकारचे ऐश्वर्य. भग शब्द अतिशय मौलिक स्वरुपाचा आहे. विष्णुपुराणात भग या शब्दाचे सहा अर्थ वर्णिले आहेत. ‘ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रिया। ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा॥’ सर्व प्रकारचे ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य या सहा तत्त्वांना भग असे म्हणतात. जो आपल्या अथक साधनेतून व प्रयत्नांतून या सहा गोष्टी मिळवतो, तो भगाने परिपूर्ण आहे असे म्हटले जाते. अशा या महान विभूतींनाच तर भगवान किंवा ‘भगवंत’ असे म्हणतात. जसे की, भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण इत्यादी. कारण, या महापुरुषांनी आपल्या जीवनात वरील सहा गोष्टींचा, प्रयत्नपूर्वक अंगीकार केला होता. ‘ईश्वर’ या शब्दाचा भाववाचक शब्द म्हणजे ऐश्वर्य. हे ऐश्वर्य भौतिक व आध्यात्मिक असे दोन प्रकारचे असते. म्हणूनच समग्र ऐश्वर्याने युक्त असणारा महामानव भगवंत ठरतो. सर्वश्रेष्ठ गुण, कर्म व सद्वृत्तींनी व शुद्ध आचरणाने ज्यांनी युगानुयुगे आदर्शाची स्थापना केली, ते भगवंत म्हणून मान्यता प्राप्त झाले. या दृष्टीने, ‘यशो भगस्य विन्दतु।’ ही वेदसुक्ती बरेच काही सांगून जाते. याचा अर्थ होतो, मला पुष्कळ धन प्राप्त होवो. मी कधीही दरिद्री होणार नाही. कोणाच्याही पुढे हात पसरणार नाही. अन्नधान्य, गायी-म्हशी, घोडे, सोने-चांदी, भूमी, भवन, मोटार गाड्या इत्यादी अशा सर्व प्रकारच्या भौतिक ऐश्वर्याचा मी स्वामी होईन. असे असले तरी, खर्या अर्थाने माणूस भौतिक धन व साधनांनी कधीच शाश्वत सुखी व आनंदी होत नाही. त्यासाठी गरज असते, ती आध्यात्मिक सुखाची. म्हणूनच ’भग’ या शब्दाचा, ’आध्यात्मिक ऐश्वर्य’ असादेखील अर्थ होतो. म्हणूनच उपनिषदात ‘न वित्तेन तर्पणीयो मनुष्यः।’ असे म्हटले आहे. माणूस धनाने कधीच तृप्त होत नाही. आजपर्यंत भौतिक धनसंपदेत लोळणारा व साधनांच्या गराड्यात वावरणारा माणूस, कधी आनंदी झाला नाही. याउलट आंतरिकदृष्ट्या पोखरलेला दिसतो. म्हणूनच तर, त्याची शाश्वत सुख मिळवण्याची धडपड असते. त्याला अत्याधिक गरज असते, ती आत्मिक आनंदाची. याकरिता मानवाने यम -नियमांचे पालन, ईश्वराची भक्ती, उपासना, प्रार्थना आणि समर्पण यांद्वारे अध्यात्माकडे वळले पाहिजे. अध्यात्मसाधना म्हणजेच योगसाधना. अष्टांगयोग व भक्ती उपासनेच्या मार्गाने, ईश्वरीय व्यवस्थेत जगणारा मानव कधीच दुःखी किंवा त्रस्त होत नाही. म्हणूनच तर आध्यात्मिक धनाची त्याला गरज भासते. भग या शब्दाचा अर्थ आध्यात्मिक ऐश्वर्यदेखील होतो. अशा ऐश्वर्याचे यश मला प्राप्त होवो, जे की कधीही न संपणारे आहे असे भक्त इथे म्हणत आहे. खरे तर, हे सर्व प्रकारचे भौतिक यश अल्पकालिक असते. ते तर सदासर्वदा, सर्वकाळी टिकून राहणारे असावे.
यशाचा कालावधी वर्ष-दोन वर्षे किंवा काही काळापुरता मर्यादित नको, तो तर जीवनभरासाठी अमर्यादित स्वरुपाचा असावा. भौतिक धनसंपत्तीचे ऐश्वर्य किंवा आध्यात्मिक ऐश्वर्य हे दोन्ही स्थायी रुपानेठेवावयाचे असेल, तर जे जे आपणास मिळाले, ते ते इतरांना वितरित करण्याचा प्रयत्न करावा. भौतिक धन किंवा आध्यात्मिक ज्ञान या दोन्हींचे उदार अंतःकरणाने दान केल्याने, लाभणारे यश चिरंतन व अनंत काळापर्यंत टिकून राहणारे असते. कारण, दातृत्व हा माणसाचा असा गुण आहे की, जो यशस्वी माणसाला नेहमीच यशाच्या शिखरावर आरुढ करतो. त्याच्यापासून यश कदापि दूर जात नाही. ज्याप्रमाणे माणसाची सावली ही त्याची संगत सोडत नाही, त्याचप्रमाणे यशस्वी माणसाच्या जीवनातील यश हे अगदी छायेप्रमाणे सोबत राहते, ते त्यापासून दुरावत नाही. म्हणूनच मंत्रात म्हटले आहे, ‘यशो मा प्रतिमुच्यताम्।’ म्हणजेच, मला यशाने कधीही सोडू नये. मी नेहमीच त्याच्या संगतीत राहीन. इतर सर्व प्रकारचे धनऐश्वर्य नाहीसे झाले तरी चालेल परंतु, उत्तम यश हे मात्र नेहमीच टिकून राहो. बसता-उठता, चालता-बोलता, जागेपणी-झोपेत अशा सर्वच अवस्थांमध्ये, हे यश माझ्या सान्निध्यात राहो. यशापासून मी दुरावता कामा नये. कारण अपयश म्हणजे मृत्यू आणि यश म्हणजेच जीवन असते. अगदी जीवनाच्या अंतापर्यंत माझ्याकडे यश स्थिररुपाने विद्यमान असो. अशा या यशामुळेच तर, मानवाचे जीवन तेजस्वी होतेे. समाजात यशस्वी माणसालाच किंमत असते. मानसन्मान व गौरव प्राप्त होतो, तो केवळ यशस्वी माणसांनाच! यासाठी श्रुतीमातेची ‘यशो मा प्रतिमुच्यताम्।’ ही पवित्र अभिलाषा, अतिशय मौलिक स्वरुपाची आहे. मानवाला आपल्या यशाची पताका फडकावत ठेवायची असेल, तर त्यासाठी त्याचे वक्तृत्व खूपच प्रभावी असले पाहिजे. कारण उत्तम वक्त्याचाच प्रभाव, श्रोत्यावर पडत असतो. आपले मंचावरील बोलणे, विशेष करून जाहीर सभेच्या ठिकाणी दिले जाणारे भाषण, हे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे असावे. याच भावनेपोटी मंत्रात म्हटले आहे, ‘यशसा अस्याः संसदोऽहं प्रवदिता स्याम।’ म्हणजेच, मी या सभेचा किंवा संसदेचा यशस्वी प्र+वदिता, उत्तम प्रवक्ता बनू इच्छितो. वदिता म्हणजेच, सभेत बोलणारा साधारण वक्ता. अशा सामान्य वक्त्यांमुळे, श्रोत्यांवर विशेष प्रभाव पडत नाही. त्याकरिता अशा सामान्य वक्त्यांची नव्हे, तर उत्कृष्ट वक्त्यांची गरज असते. प्रवदिता अर्थात प्रकृष्ट, उत्कृष्ट वक्ता हवा. जगातील दिशाहीन मानवसमूहाला योग्य ती दिशा देऊन, त्यांचे जीवन सर्वदृष्टीने सुविकसित करावयाचे असेल किंवा त्यांना सन्मार्गावर आणावयाचे असेल, तर प्रकृष्ट उत्तम वक्त्याची गरज भासते. साधारण वक्ते हे बोलतात वेगळे आणि वागतात वेगळेच. म्हणूनच, केवळ शब्द व वाक्यांची फेकाफेक करणार्या वाचाळवीरांचा मग ते कितीही विद्वान असोत, जर ते व्यवहारहीन व आचरणशून्य असतील, तर त्यांचा कधीच जनतेवर प्रभाव पडत नाही. अशा वक्त्यांचे लोक ऐकतात व विसरून जातात. पण प्रवदिता अर्थात प्रवक्ता हा मात्र, ‘बोले तैसा चाले’ या वचनाप्रमाणे जगत असतो. तो बोलेल कमी, पण आचरण मात्र खूप चांगले करील. अशा शुद्धाचरणी कृतियुक्त धर्मात्मा प्रवक्त्यांचे बोलणे, लोक शांतपणे ऐकतात व त्यांच्याप्रमाणे आचरणदेखील करतात. उत्कृष्ट जीवन आणि उत्कृष्ट भाषण हे समीकरण, प्रवदिता व्यक्तींमध्ये असते. असा प्रवदिता हा यशस्वी होतो आणि तो राष्ट्राचा किंवा समाजाचा, निर्माता मानला जातो. त्याकरिता वेदमंत्रात यशस्वी प्रवक्ता होण्याची केलेली कामना, ही अतिशय विलक्षण अशी आहे.
एकूणच, वेदमंत्रात वर्णिलेली शाश्वत यशाची तीव्र अभिलाषा, ही आजच्या प्रत्येक मानवाकरिता अतिशय बोधप्रद व जीवन-वरदायिनी आहे.
9420330178
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य