आई जगदंबा भक्तमनोरथ पूर्ण करणारी आहे. तिच्या भक्तीमध्ये लीन असलेल्या साधकाला, त्रिभुवनाचे सौंदर्य देखील थिटे आहे. भगवतीच्या भक्तीमध्ये न्हाऊन निघालेल्या साधकाचे सर्व विषयांचे भाव लोप पावतात. शिवशक्तीचे ऐक्यच या विश्वाचे सार असल्याने भगवतीच्या उपसकाला शिवाराधनेचे पुण्य देखील प्राप्त होत असते. त्रिपुरसुंदरी भगवतीच्या या भक्तीमहिमेचा हा भावार्थ ...
श्लोक क्रमांक 20
तव विमलेन्दुकलं वदनेन्दुमलं कलयन्ननुकूलयते किमु पुरुहूतपुरीन्दुमुखीसुमुखीभिरसौ विमुखीक्रियते।
मम तु मतं शिवमानधने भवती
कृपया किमु न क्रियते
जय जय हे महिषासुरमर्दिनि
रम्यकपर्दिनि शैलसुते॥20॥
पदच्छेद
तव=तुझे, विमल=स्वच्छ, इन्दु=चंद्र, कलम=स्वरुप, शोभा, वदन=मुख, इन्दु=चंद्र, मलं=मलीन, कलयन=लक्षपूर्वक, ननु=वास्तवात, कूलयते=स्वच्छ करणे, प्रक्षालन करणे, किम=कामना किंवा इच्छा निदर्शक शब्द, ऊ=ज्यातून व्यक्त होतो, पुरुहूतपुरी=अमरावती इंद्रनगरी, इन्दुमुखी=चंद्राप्रमाणे मुखकमल असणारी, सुमुखीभि=सुंदर स्त्रिया, असौ=त्या विमुखीक्रियते=उपेक्षा करणे शक्य आहे, मम=माझा, तु मतं=हा विश्वास आहे, शिवमानधने=शिव जिचे सर्वस्व आहे, भवती=त्या तुला, कृपया=अनुग्रह करून, किम् न क्रियते=कोणतीही इच्छापूर्ती करणे काय अशक्य आहे, जय जय हे=तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनी=महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य=सुंदर, कपर्दिनी=जटाधारी, शैलसुते=हिमालयाची कन्या.
शब्दार्थ
तेजस्वी चंद्राप्रमाणे जिचे मुखकमल आहे, त्याच्या प्रभावाने सर्व वैषयिक भाव लोप पावतात. या प्रभावामुळेच, इंद्र लोकीच्या सुंदर अप्सरांचाही मला मोह पडू शकत नाही. तुझ्या चरणी लीन असलेल्या साधकाला, शिवरुपी धन आपसूकच प्राप्त होते (तो तुझा पती असल्याने साधकाला त्याची वेगळी आळवणी करावी लागत नाही) आणि म्हणूनच, तो साधक तुझ्या स्तुती करताना कायमच म्हणेल, रम्य केशसंभार असणार्या हे देवी, तुझा सतत विजय असो.
भावार्थ
सुंदर स्त्रियांच्या सहवासाची कामना प्रत्येक पुरुषाला असते. इंद्र लोकीच्या अप्सरा, या त्यांच्या दैवी आणि मादक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, देवी भगवतीचा जो साधक, तिच्या मुखकमलाच्या उपासनेत निमग्न होतो. त्याला तिच्या मुखमंडलावरील तेज चंद्राच्या तेजासमान, अत्यंत आल्हाददायक आणि सात्विक भासते. साधक या तेजामध्येच हरवून जातो. या शुद्ध सौंदर्याच्या साक्षात्कारानंतर, साधकाला इंद्र लोकीच्या अप्सरांच्या सुंदर चेहर्याचासुद्धा मोह उरत नाही.
शिवपत्नी जगदंबेच्या उपासकाला, तिच्या उपासनेसह शिवरुपी धनाचासुद्धा आपसूक लाभ होतो. कारण, शिव आणि शक्ती हे कायमच ऐक्य स्वरुप आहेत. देवीच्या उपासनेत निमग्न साधकाला, शिवाच्या कृपाप्रसादाचा लाभ होतो. तसेच, शिवाच्या धन स्वरुपाची आणि सामर्थ्याची स्तुती करणारा साधक देवीलासुद्धा प्रिय असतो. कारण, तो तिच्या पतीचा सन्मान वाढवणारेच कृत्य करत असतो.
देवीच्या या उपासनेच्या महिमेचे वर्णन करत कवी पुढे म्हणतो, उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे, तुझा सतत जय असो.
श्लोक क्रमांक 21
अयि मयि दीन दयालुतया
कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननीति यथाीसि
मयीसि तथाीनुमतासि रमे।
यदुचितमत्र भवत्पुरगं कुरु शाम्भवि
देवि दयां कुरु मे
जय जय हे महिषासुरमर्दिनि
रम्यकपर्दिनि शैलसुते॥21॥
पदच्छेद
अयि=हे, मयि=माझ्यावर, दीन=गरीब, दयालुतया=दयाळू, कृपया=कृपा कर, इव=ज्याप्रमाणे, त्वया=तुझ्याद्वारे, भवितव्यम=व्हावी, उमे=शिवपत्नी अयि=हे, जगतः=संपूर्ण जगाची, जननी=आई, इति=आहे, यथा= जशी, असि=आहे, मय्यसि=माझीपण असावी, तथा=तशीच, अनुमता=प्रेमळ, असि=आहे, रमे=हे महालक्ष्मी
यद्=जो, उचितम्=योग्य, अत्र=या विषयानुषंगाने, भवत्=आपल्या, पुरगं=सुपात्र, कुरू=बनवणे, शाम्भवि=हे शिवे, देवि=देवी, दया=अनुग्रह, कुरू=कर, मे=माझ्यावर. जय जय हे=तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनी=महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य=सुंदर, कपर्दिनी=जटाधारी, शैलसुते=हिमालयाची कन्या.
शब्दार्थ
हे जगदंबे, मी तुझा अत्यंत दीन उपासक आहे. तुझ्या कृपेचा अभिलाषी आहे. जे उचित असेल, त्याप्रमाणे तूच आता माझ्यावर कृपा कर. तुझ्या लोकाच्या निवासाचे भाग्य मला लाभावे, अशी कृपा कर. हे रम्य केशसंभार असणारी देवी, तुझा सतत विजय असो.
भावार्थ
या श्लोकात कवीने आपला शरणागत भाव व्यक्त केला आहे. कवी म्हणतो, हे जगदंबे, तू समस्त विश्वाची माता आहेस. तू माझीसुद्धा माता आहेस. मी एक हीन दीन असा तुझा, अत्यंत सामान्य उपासक आहे. तुझ्या कृपादृष्टीसाठी मी व्याकूळ झालो आहे. माझ्यावर दया कर. माझे तुझ्याकडे एकच मागणे आहे, तुझ्या लोकी मला निवास करता यावा, एवढी माझ्यावर कृपा कर. माझी जी पात्रता आहे, त्यानुसार तुझा कृपावर्षाव माझ्यावर होऊ दे.
उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे, तुझा सतत जय असो.
श्लोक क्रमांक 22
स्तुतिमिमां स्तिमितः सुसमाधिना
नियमतो यमतोऽनुदिनं पठेत्।
प्रिया रम्या स निषेव्यते परिजनोऽरिजनोऽपि च ते भजेत्॥22॥
पदच्छेद
स्तुतिम्=स्तुती, इमां=या, स्तिमितः=स्थिर राहून, सुसमाधिना=सुविचारासह एकाग्र होऊन, नियमतः नियमपूर्वक, यमतः=स्वतःवर नियंत्रण ठेवून, अनुदिनं=दररोज, पठेत्=जो पठण करतो, प्रिया=प्रिय, रम्या=सुंदर स्त्री, स=त्याला, निषेव्यते=सेवा प्राप्त होते, परिजनः=नातेवाईक, अरिजन=शत्रूपक्षातील लोक, अपि=पण, च=आणि, ते=त्याला, भजेत्=सन्मान देतात.
शब्दार्थ
जो व्यक्ती एकाग्र होऊन आणि इंद्रियनिग्रह साधून , देवीच्या या स्तोत्राचे पठण करतो, त्याला सुलक्षणी पत्नी प्राप्त होते आणि त्याचे प्रापंचिक जीवन सुखकर होते. त्याचे आप्तेष्ट आणि त्याचे शत्रुसुद्धा त्याच्याशी सन्मानपूर्वक वर्तन करतात.
भावार्थ
या स्तोत्राचा उल्लेख संकटास्तुती असासुद्धा केला जातो. अर्थात, या स्तोत्राचे पठण साधकाला सर्व संकटांपासून मुक्त करते. देवीच्या या स्तोत्राचे भाव जाणून, श्रद्धापूर्वक, चित्त एकाग्र ठेवून आणि इंद्रियनिग्रह साधून पठण करणे अत्यावश्यक आहे. देवीच्या या उपासनेच्या महिमेचे वर्णन करत कवी पुढे म्हणतो, उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे, तुझा सतत जय असो.
या पद्धतीने उपासना करणार्या साधकाला मनोरम देह असणारी, पतीच्या इच्छेचा सन्मान करणारी सुलक्षणी पत्नी प्राप्त होते आणि पतीपत्नींचे वैवाहिक नाते उत्तम फुलते. साधकाला सर्व सुख, संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. साधकाचा सन्मान त्याचे आप्तेष्ट आणि मित्रच करत नाहीत, तर त्याच्या शत्रूच्या मनातसुद्धा साधकाच्या बद्दल आदरयुक्त भीतीची भावना असते आणि तेसुद्धा साधकाचा सन्मानच करतात. अर्थात, साधक सर्वार्थाने सुखी आणि धन्य जीवन व्यतीत करतो.
9370043901
सुजीत भोगले