शेअर बाजारात तेजीची लहर ! ६५४ अंशांची उसळी

निफ्टीचा निर्देशांकही वधारला

    29-Jan-2025
Total Views |



s 


 

मुंबई : खनिज तेलाच्या किंमतीत झालेली घट आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेकडून जानेवारीच्या शेवटी व्याजदरांत बदल न करण्याचे संकेत दिल्याने बुधवारी शेअर बाजारात तेजीची सुखद लहर उमटली. सेन्सेक्समध्ये ६५४ अंशांची वाढ होत ७६,५५५ अंशांचा टप्पा गाठला. निफ्टीमध्येही २०६ अंशांची वाढ होत निर्देशांक २३,१६३ अंशांवर थांबला. या तेजीमागे बँकिंग क्षेत्रात आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ हे प्रमुख कारण आहे. या तेजीच्या तुलनेत एफएमसीजी क्षेत्राने मात्र घसरण अनुभवली. १ फेब्रुवारी रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या भारताचा अर्थसंकल्प जाहीर करतील, त्या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याची आशा हे सुध्दा या वाढी मागचे प्रमुख कारण आहे.

 

बुधवारी बाजारात श्रीराम फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एसबीआय लाइफ, टाटा मोटर्स या महत्वाच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. खनिज तेलांच्या किंमतीत घट झाल्याने ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली. बँकांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमागे भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारी रोखे खरेदी करुन बाजारातील रोकड तरलता वाढवण्याचा केलेला प्रयत्न हे सुध्दा एक प्रमुख कारण आहे.

 

भारताचा अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पातून रोजगारनिर्मिती आणि मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी ठोस उपाय योजना असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड्समध्ये दीर्घ परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणुक वाढली आहे. याबरोबर खनिज तेलाची घटती किंमत, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचे दिलेले संकेत यांमुळे शेअर बाजारात ही तेजी दिसून येत आहे. असे मत शेअर बाजाराचे तज्ज्ञ मांडत आहे.