मुंबई महानगर क्षेत्रात अधिकच्या परिवहन सेवेचे पर्याय निर्माण करा

मंत्री प्रताप सरनाईक : रोप वे निर्माण करण्याकरीता नवीन यंत्रणा तयार करण्याची गरज

    29-Jan-2025
Total Views |
 
Pratap Sarnaik
 
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील जास्त वर्दळीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवांचे पर्याय निर्माण करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवार, २९ जानेवारी रोजी दिले.
 
प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरविकास विभागाचे अधिकारी, मेरी टाईम बोर्डाचे अधिकारी, परीवहन आयुक्त यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  ...तर मी राजीनामा देणार! मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
 
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येसोबतच प्रवाशांची संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेला मर्यादा येत आहे. दरम्यान, मुंबईत कोणत्या मार्गांवर कोणती परिवहन सेवा उपलब्ध करून देता येईल, याबाबत विचार करावा. तसेच जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुविधेसाठी यंत्रणांनी अधिकच्या परिवहन सेवांचे पर्याय निर्माण करावे," अशा सूचना त्यांनी दिल्या.
 
पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी!
 
"भूमीगत पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी व्यावसायिक मॉल असावे. यासोबतच पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी. बांद्रा पूर्व ते कुर्ला दरम्यान ८.८ किलोमीटर अंतराची ही सेवा असून यामध्ये ३८ स्थानके असतील. यात दर १५ सेकंदाला स्टॉप राहणार असून त्यानुसार कामाचे नियोजन करा," असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
 
ते पुढे म्हणाले की, "रोप वे निर्माण करण्याकरीता नवीन यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन नियम तयार करावे. तसेच शहरातील पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएने भूमीगत पार्किंग प्लाझा तयार करण्याबाबत सर्वेक्षण करावे. तसेच या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करा," असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.