बालगृहांचे आधुनिकीकरण करा! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंच्या सूचना
बालगृहातील मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तात्काळ सोडवावे
29-Jan-2025
Total Views |
मुंबई : बालकांना बालगृहांमध्ये आल्यावर आपलेपणाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी बालगृहांचे आधुनिकीकरण करावे, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी दिले.
चौथे महिला धोरण तसेच बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांच्या मागण्यांबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) प्रवीण पडवळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "बालकांना बालगृहांमध्ये आल्यावर आपलेपणाची जाणीव निर्माण व्हावी याकरिता तसे सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी बालगृहांचे आधुनिकीकरण करावे. तसेच पोलीस विभागाने बालस्नेही पोलीस स्टेशन उभारावे," असे त्यांनी सांगितले.
"बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी लोकशाही दिनाप्रमाणे महिन्यातील एक दिवस निश्चित करण्यात यावा. तसेच महिला व बाल विकास विभाग आणि कौशल्य विकास विभागाने संयुक्तपणे अनाथ मुली आणि महिलांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करावे. भूमिहीन अनाथ महिलांना प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजनांमध्ये सामावून घेण्याबाबत विचार करण्यात यावा. यासोबतच महिला व बालविकास विभागाने कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या बालकांच्या सद्य:परिस्थितीचा आढावा घ्यावा. तसेच पॉक्सो प्रकरणातील मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा," अशा सूचनाही नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.