मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Saints in Northeast India) प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभादरम्यान नुकताच ईशान्य भारतातील संत समाजाचा गौरव करण्यात आला. महाकुंभ परिसरातील प्राग्ज्योतिषपूर क्षेत्रात आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड येथून विविध संत-महंत आले आहे. या संतांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल जी यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधत डॉ. कृष्णगोपाल जी म्हणाले की, "भारतातील कोणताही प्रदेश हा जितका त्या प्रदेशातील लोकांचा आहे, तितकाच तो पूर्वोत्तर भागातील लोकांचाही आहे. पाचशे वर्षांहून अधिक काळ संघर्ष आणि बलिदानातून ईशान्येतील पूज्य संतांनी आपला शाश्वत वारसा जपला आहे." कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित शांती काली आश्रमाचे अध्यक्ष पद्मश्री स्वामी चित्तरंजनजी महाराज, श्री श्री १००८ श्री महंत महामंडलेश्वर स्वामी श्री केशवदास जी महाराज, श्री जनार्दन देव गोस्वामी, कुसुम कुमार महंत, यांनीही मार्गदर्शन केले.