दिव्यांगांचे द्रोणाचार्य

    29-Jan-2025   
Total Views |

द्रोणाचार्य भाऊसाहेब सोनवणे
दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे द्रोणाचार्य भाऊसाहेब सोनवणे यांच्याविषयी..
गोष्ट आहे अशा व्यक्तीची, ज्यांना सुरुवातीला कर्णबधीर मुलांच्या शिक्षणपद्धतीबाबत फारशी माहितीही नव्हती. पण आज तीच व्यक्ती, जव्हारच्या एका कर्णबधीर मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ते व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब भगवंत सोनवणे होय. भाऊसाहेब जव्हार तालुक्यातील ‘प्रगति प्रतिष्ठान’ संचालिक निलेश मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालयात, गेली 28 वर्षे कार्यरत आहेत. एक आदर्श शिक्षक ते आदर्श मुख्याध्यापक म्हणून, त्यांची विशेष ओळख आहे.
 
भाऊसाहेब यांचा जन्म, नाशिकच्या देवळा तालुक्यातील वार्शी गावी झाला. आई, वडील, सहा बहिणी असा त्यांचा परिवार. भाऊसाहेबांचे प्राथमिक शिक्षण वार्शी येथेच झाले, तर वार्शीपासून चार-पाच किमी अंतरावर असलेल्या खर्डे गावात, त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. पुढे वाणिज्य विषयात अकरावी व बारावी झाल्यानंतर, कळवण येथे ‘आदिवासी विकास भवन’ वसतिगृहामध्ये ‘बी.कॉम.’ करून, पदवी प्राप्त केली.
 
‘आदिवासी विकास भवन’ वसतिगृहामध्ये असताना, तिथे रावसाहेब शिंदे हे प्राचार्य होते. भाऊसाहेब त्यांच्याच गावचे. भाऊसाहेब यांचा अकाऊंट्स विषय चांगला असल्याने, त्यांचा प्राध्यापक आणि प्राचार्यांशी खास परिचय होता. भाऊसाहेबांना लहानपणापासूनच वाचनाची आवड. स्वातंत्रवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित तसेच वेगवेगळ्या विषयांवरील अनेक पुस्तके त्यांनी वाचली आहेत. पदवी पूर्ण झाल्यानंतर तेथील प्राध्यापकांनी, त्यांना ‘एमएसडब्लू’ म्हणजेच समाजकार्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यास प्रोत्साहित केले. मात्र, त्यांनी नाशिकला येऊन ‘एम.कॉम.’ पूर्ण केले.
 
घरची परिस्थिती हालाखीची म्हणून, नातेवाईकांनी नोकरी करण्याचा आग्रह धरला. तसे म्हटले, तर भाऊसाहेब हे गावातील पहिले विद्यार्थी होते, ज्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली होते. शिकत असताना मधल्या काळात त्यांनी, स्पर्धा परीक्षांची देखील तयारी केली. ‘एमपीएससी’ची प्रवेशपरीक्षा त्यांनी दिली. मात्र, पुढे ‘मुख्य परीक्षा’ देणे शक्य झाले नाही.
 
1995 दरम्यान भाऊसाहेबांचा संपर्क अशोक खताळे या गृहस्थांशी आला. ते कर्णबधीर मुलांशी संबंधित एक अभ्यासक्रम तयार करत होते. तोवर भाऊसाहेबांना याबाबत काहीच माहीत नव्हते. अशोक खताळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, त्यांना या क्षेत्राची आवड निर्माण झाली. भाऊसाहेबांनी त्यांचा मार्ग बदलत. वाणिज्यामध्ये ‘बी.एड.’ करण्याऐवजी, कर्णबधीर मुलांसंबंधित क्षेत्रात ‘बी.एड.’ करायचे ठरवले.
 
वांद्रे येथील ‘अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग डिसॅबिलिटीज दिव्यांगजन’ ही मुंबईतील, एकाअर्थी देशातीलच एक नामवंत संस्था. याठिकाणी शिकलेली व्यक्ती, देशात कुठेही कर्णबधीर मुलांना शिकवू शकते, असा तेव्हा अनेकांचा समज होता. त्या संस्थेमध्ये त्यांनी आपल्या पुढील शिक्षणास सुरुवात केली. त्याकाळात एका शाळेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून असताना जेव्हा मुलांशी थेट संपर्क आला, तेव्हा त्यांची खरी परीक्षा सुरू झाली. खुणांद्वारे शिकवायचे नाही असे जेव्हा त्यांना सांगण्यात आले, तेव्हा त्यांना थोडे अवघडले. परंतु, तेथील मुलांना ज्यापद्धतीने अचूक खुणांचा वापर करून भाऊसाहेबांनी शिकवले, तेव्हा ती पद्धत तेथील सर्वांना आवडली.
 
ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर, नोकरीसाठी 1996 दरम्यान ‘प्रगति प्रतिष्ठान’च्या निलेश मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालयामध्ये अर्ज केला. विशेष म्हणजे, तिथल्या संचालिका सुनंदा पटवर्धन यांनाही ‘अली यावर जंग’मधलीच व्यक्ती हवी होती. भाऊसाहेबांच्या रुपात ती व्यक्ती त्यांना सापडलीही. दि. 18 जून 1996 पासून भाऊसाहेबांचा इथला प्रवास सुरू झाला. तेव्हा प्रमिला कोकड शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. भाऊसाहेब मुलांना शिकवत असताना, मुख्याध्यापिका वर्गावर फेरी मारायच्या. भाऊसाहेबांची कर्णबधीर मुलांशी जुळवून घेण्याची, त्यांना शिकवण्याची पद्धत शाळेतील सर्वांनाच आवडू लागली. भाऊसाहेबांचा एकच उद्देश होता की, त्यांच्या वर्गातील प्रत्येक तुकडीच्या प्रत्येक मुलाला वाचता यायला हवे. याच पद्धतीने ते शिकवायचेही, त्यामुळे मुलांनाही शिकण्याची ओढ लागत गेली. आज त्यांच्या हाताखालून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी, एक विद्यार्थी कम्प्युटर इंजिनयर आहे. चार विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले असून, दोन विद्यार्थ्यांनी ‘आयटीआय’ परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. भाऊसाहेबांचा एक विद्यार्थी वायरमन म्हणूनही काम करतो, तर एकजण शिवणकामात तरबेज आहे. एक विद्यार्थी वेल्डिंग कामात निपूण झाला आहे. विशेष म्हणजे शितल सपकाळ या त्यांच्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थिनीचा, सातवीपर्यंत सलग पहिल्या पाच मुलांमध्ये क्रमांक यायचा. गणित या विषयात ती ‘चाणक्य’ होती. ‘प्रगति प्रतिष्ठान’चे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र चंपानेरकर यांचा , भाऊसाहेबांना प्रत्येक कामात कायम पाठिंबा असतो, तसेच ते वेळोवेळी प्रोत्साहनही देतात.
 
भाऊसाहेब म्हणतात, त्यांचे विद्यार्थी जेव्हा आपल्या तोंडून योग्य उच्चार काढतात, हे त्यांच्यासाठी खरे समाधान आहे. कर्णबधीर मुले जर जन्माला आलेच, तर पालकांनीही लवकरात लवकर त्याचे निदान केले पाहिजे. कारण त्या मुलाची योग्य वेळी ऐकण्याची क्षमता वाढवली, तर तो सामान्य मुलांसारखा तो होऊ शकतो. समाजातही अशी मुले कुठे भेटली, तर त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वकच प्रत्येकाने वागले पाहिजे. आईवडील मुलांना शाळेत आणून सोडतात. मात्र, अशा मुलांना घडवणारा हा शिक्षकच असतो. कर्णबधीर मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे मुख्याध्यापक भाऊसाहेब सोनवणे, यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराच्यावतीने अनेक शुभेच्छा.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक