अमृतसर सुवर्ण मंदिरापासून जेमतेम चार ते पाच मिनिटांवर असलेल्या ‘हेरिटेज स्ट्रीट’वर 30 फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका नराधमाने विटंबना केली. संविधानाची प्रतही जाळली. तेही नेमके प्रजासत्ताक दिनी! या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत प्रसारित झाला. ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयंकरच.
अमृतसर सुवर्ण मंदिरापासून जेमतेम चार ते पाच मिनिटांवर असलेल्या ‘हेरिटेज स्ट्रीट’वर 30 फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका नराधमाने विटंबना केली. संविधानाची प्रतही जाळली. तेही नेमके प्रजासत्ताक दिनी! या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत प्रसारित झाला. ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयंकरच. मात्र, गुन्हेगार हे कृत्य करत असताना आजूबाजूने शेकडो लोक जात होते. तसाही हा परिसर गजबजलेला. त्यातच जवळच पोलीस चौकी. पण, हे कृत्य घडत असताना त्या गुन्हेगाराला सुरुवातीलाच कोणीही अडवले नाही.
इतकेच नाही, तर पुतळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला शिडीवर चढावे लागले. हातोडा घेऊन ही व्यक्ती पुतळ्याजवळ का जात आहे, याचा पुसटसाही संशय त्यावेळी कुणाला आला नाही का? काही लोक तर याचे व्हिडिओ चित्रीकरण करत होते. समाज असा निष्क्रीय झाला की त्याच्या संवेदनाच मेल्या? याच पंजाबमध्ये 35 टक्के अनुसूचित समाजाची लोकसंख्या आहे. त्यातही रोहिदासी वाल्मिकी आणि मजहबी शिखांचीं लोकसंख्या जास्त. हे तीनही समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्राणांपेक्षा प्रिय मानतात. त्यामुळे या घटनेनंतर बंद पुकारण्यात आला. त्या गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. मात्र, त्याने हे का केले, याबाबत काही स्पष्टीकरण नाही. यावर वाटते की, हा एक आत्मघातकी हल्लाच आहे, असे का मानू नये? अशा प्रकारच्या घटनांचा मागोवा घेताना जाणवते की, देशद्रोह्यांनी त्यांची कार्यपद्धती बदलली असावी. आत्मघातकी हल्ले घडवून स्फोट करणे, हल्ले करणे यात काही निष्पाप लोक मरतात. त्यामुळे दहशतवादी संघटनांबद्दल घृणा पसरते. दहशतवाद्यांना पुढची विघातक कृत्ये करण्यास अडसर येतो. याउलट एखाद्या महापुरुषाच्या मूर्ती किंवा देवीदेवतांच्या पवित्र मूर्ती, स्थळाचे विटंबन केले, तर त्यांना फायदा होतो. कारण, विटंबना केल्याने कोणी मरत जरी नसले, तरी समाजात भयंकर तेढ निर्माण होते. समाजात गटतट पडून आपसांत दुरावा निर्माण होतो. त्यानंतर बंद उपोषण आंदोलन मोर्चे आणि हिंसा यांना खतपाणी घालून परिसरात सहज अराजकता निर्माण करता येते. परभणी असो की पंजाब, पंजाबमध्ये सातत्याने हे घडत आहे. यामगाची विघातक शक्ती कोण, हे ओळखणे गरजेचे आहे. पंजाबच्या त्या संतापजनक घटनेचा निषेध करावा तितका थोडा!
हे खरेच थांबले पाहिजे!
मुंबईतील विक्रोळी येथील रेल्वेरूळावरुन ‘गरीब रथ एक्सप्रेस’ धावत होती. त्या एक्सप्रेससमोर स्वतःला झोकून देऊन भांडूपमध्ये राहणार्या 20 वर्षांच्या युवकाने आणि 15 वर्षांच्या युवतीने नुकतीच आत्महत्या केली. कारण, त्यांच्या प्रेमाला दोघांच्याही घरातल्यांचा विरोध होता. अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. समाज म्हणून आपण बघ्याचीच भूमिका घेणार आहोत का?
प्रेमाला घरातल्यांचा विरोध झाला म्हणून जीव दिला, ही घटना सुन्न करणारीच. यामागचे गुन्हेगार कोण? माता-पिता, कुटुंबीय? नाही. कारण, कोणत्याही आईबाबांना कधीही वाटत नसते की, आपल्या मुलांचे वाटोळे व्हावे. उलट त्यांना वाटते की, आपल्या मुलीने-मुलाने सुखी राहावे. या परिक्षेपात समाजावर आजही नातेसंबंधांचा पगडा आहे. एखाद्याच्या अपत्याने परजातीत विवाह केला, तर त्या घरावर अनेकदा अघोषित बहिष्कार घातला जातोच. त्यामुळे बहुतेकदा आईबाबा अपत्यांच्या प्रेमप्रकरणाच्या विरोधात असतात. दुसरीकडे मुलामुलींवर काय संस्कार झालेले असतात? ‘एक दुजे के लिये? जियेंगे तो साथ, मरेंगें तो साथ? प्यार हैं तो रूखी सुखी रोटी खा के फुटपाथपर जी लेंगे? तू मेरी नही हो सकती, तो किसी की नही हो सकती? मेरा पहला प्यार’ म्हणत आयुष्य दावणीला लावलेल्यांचे उदात्तीकरण अशा आशयाचे सिनेमे, साहित्य, समाजमाध्यमांमध्ये अशा आशयाचा सातत्याने मारा कोवळ्या वयातच मुलामुलींवर होत असतो. या सगळ्या परिक्षेपात आईबाबा आणि त्यांचे पाल्य या दोघांचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे. आयुष्यात प्रेम आणि विवाह गरजेचे आहेच, पण त्याहीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे. आयुष्यात भावना महत्त्वाच्या आहेत, मात्र त्यात वाहून जाणे म्हणजे आयुष्याचे मातेरे करणे. जन्माला आलो ते काही तरी कर्तृत्व घडवण्यासाठी. ‘आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत,’ असा सकारात्मक संवाद पालकांनी पाल्यांशी सातत्याने साधणे गरजेचे आहे. युवा मुलांच्या भावना ओसंडून वाहात असतात. त्यामुळे टोकाचा विरोध करणे, जालीम निर्बंध लादणे या गोष्टी पालकांनी टाळणे गरजेचे आहे. विक्रोळीमध्ये आत्महत्या करणार्या त्या युवक-युवतींचा जीव नक्कीच वाचला असता, असे राहून राहून वाटते. हे खरेच थांबले पाहिजे!
9594969638