पुणे : राजधानी दिल्ली मध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशक आणि प्रकाशनसंस्था प्रयत्नशील होत्या. या संमेलनात काही प्रकाशकांना त्यांची पुस्तके प्रकाशित करण्याची संधी मिळाली आहे. पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील पंचवीस पुस्तके या संमेलनात प्रकाशित होणार आहे.
“दिल्लीच्या साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित होण्याचा बहुमान मिळावा यासाठी अनेक लेखक उत्सुक होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील आणि विविध साहित्य प्रकारातील दर्जेदार पुस्तके आम्ही प्रकाशनासाठी निवडली आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन असल्याने राजधानी दिल्लीत आपला आवाज आणखी सशक्त व्हायला हवा. त्या दृष्टिने उत्तमोत्तम पुस्तके निवडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.” अशी माहिती चपराक प्रकाशनचे प्रकाशक आणि ग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष घनश्याम पाटील यांनी दिली.