मुंबई उपनगरांना 'मिनी बांग्लादेश' बनू देणार नाही : मंगल प्रभात लोढा
घुसखोरी रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना
28-Jan-2025
Total Views |
मुंबई : (Mumbai Suburbs) मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी रोखणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही त्वरित करावी आणि समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करावी, अशा सूचना मंत्री लोढा यांनी सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी दिल्या. मुंबई उपनगरांना 'मिनी बांग्लादेश' बनू देणार नाही, असेही ते म्हणाले.
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली. यावेळी सह पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याची सुरक्षा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने काही महत्वाच्या सूचना केल्या. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मलबार हिल परिसरातील जनतेसाठी सेतू सुविधा महा ई सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र सर्व सुविधांसाठी एक ठिकाण असेल, जेथे नागरिक सर्व प्रकारचे दाखले आणि नोंदणी प्रक्रिया सहजपणे करू शकतील. याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व विधानसभा सदस्यांनी जनतेच्या सोयीसाठी त्यांच्या मतदारसंघात जास्तीत जास्त सेतू कार्यालये सुरु करण्याकरिता पाठपुरावा करावा, अशा सूचना देखील लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या.
तसेच जिल्ह्यामध्ये एकूण ६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलुंड, बोरिवली, अंधेरी, कुर्ला, चांदिवली, गोवंडी) कार्यरत असून, या संस्थांतील शैक्षणिक व प्रशिक्षण विषयक सोयी-सुविधा, इमारतींचे नूतनीकरण, दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, इमारतींसाठी संरक्षक भिंत व अनुषंगिक कामांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकरिता 'जमिन संपादन व प्रशासकीय इमारतींचे बांधकाम' या योजनेंतर्गत ८९.८८ कोटी रुपये एवढी वाढीव मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.