मुंबई, दि.२८ : विशेष प्रतिनिधी 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'ला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो मुंबई मेट्रो मार्ग ८च्या उभारणीसाठी राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. मुंबई मेट्रो मार्ग-८ हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यास राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा सिडको प्राधिकरणाद्वारे विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सध्या मुंबईत वापरात असणारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणाऱ्या नव्या मेट्रो मार्गाच्या उभारणीला राज्य सरकराने गती दिली आहे. शासन निर्णयानुसार, मुंबई मेट्रो मार्ग-८ या मेट्रो मार्गिकेमधील बहुतांश लांबी नवी मुंबई परिसरात असल्याने आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोद्वारे विकसित केले जात असल्याने मुंबई मेट्रो मार्ग-८ हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यास शासनाची तत्वतः मंजुरी देण्यात येत आहे.
मुंबई मेट्रो मार्ग-८ (सीएसएमआयए ते एनएमआयए) ही अखंड मार्गिका राबविण्यास तसेच यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सिडकोमार्फत तयार करण्यास तत्वतः मंजुरी देण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो मार्ग-८ प्रकल्पासंदर्भातील सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल या संबंधीची प्राधिकरणाकडील माहिती व कागदपत्रे तात्काळ सिडकोकडे सुपूर्द करावी. सिडकोने मुंबई मेट्रो मार्ग-८ प्रकल्प उभारणीसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन शासनाच्या मंजूरीस्तव प्रस्ताव तात्काळ सादर करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही राज्य सरकारने दिले आहेत.
प्रकल्पाचे महत्व
मुंबई शहर व उपनगर व नवी मुंबई या शहरांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तसेच या शहरांमध्ये स्थित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळांच्या आजूबाजूच्या इतर प्रमुख आर्थिक विकास केंद्रांमुळे निर्माण होणारी भविष्यातील रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी, राज्य शासनाने या विमानतळांशी आंतरजोडणी सुधारण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. आजूबाजूचे रस्ते आणि रेल्वे जाळे मजबूत करण्याचा मार्ग तसेच नवी मुंबईत कनेक्टिव्हिटीचे नवीन पर्याय विकसित करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन विमानतळांना मुंबई मेट्रो मार्ग-८ (सीएसएमआयए ते एनएमआयए) या मेट्रो रेल्वे मार्ग जोडले जाणार आहेत. याबाबत दि.२७ मे, २०२४ रोजी मुख्य सचिवांकडे बैठक संपन्न झाली होती.