नरिमन पॉईंट ते वांद्रे प्रवास १५ मिनिटांवर

कोस्टल रोड वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारी उत्तर वाहिनी

    28-Jan-2025
Total Views |

mumbai coastal


मुंबई, दि.२८ : विशेष प्रतिनिधी 
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर दि.२७ जानेवारीपासून सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग मुंबईकरांसाठी खुला झाला.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉईट कडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण करण्‍यात आले. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पण देखील यावेळी करण्‍यात आले. त्‍यानंतर ते प्रसार माध्‍यम प्रतिनिधींसमवेत बोलत होते. सोमवार, दिनांक २७ जानेवारीपासून मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला झाला.
उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्‍यमंत्री कार्यालयाच्‍या प्रधान सचिव आश्विनी भिडे, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, मुंबई उपनगर जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्‍य अभियंता (किनारी रस्‍ता प्रकल्‍प) मांतय्या स्‍वामी यांच्‍यासह विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. या रस्त्याचे दुभाजक सुशोभीकरण करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
"धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे मुंबईच्‍या आंतरराष्ट्रीय नावलौकीकात भर पडली आहे.मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाच्‍या उत्तर वाहिनी पूल आणि इतर तीन आंतरमार्गिकेचे लोकार्पण करत आहोत. मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. या किनारी रस्‍ता प्रकल्‍पामुळे इंधन आणि वेळेची बचत होण्‍याबरोबरच प्रदूषण कमी होण्‍यास मदत होणार आहे. मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पातील एका भागाचे सुशोभीकरण सुरू असून ७० हेक्‍टर क्षेत्रावर हरित क्षेत्र विकसित केले जाणार आहे. एकूणच, मुंबईचे भूषण म्हणूनच मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाकडे आपल्याला पाहता येईल"

- देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री


"धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्‍प(दक्षिण) अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामामुळे आपण परदेशात आहोत, अशी जाणीव निर्माण होते. नरिमन पॉईट कडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्‍तर वाहिनी पुलाच्‍या आणि इतर तीन आंतरमार्गिकांच्‍या लोकार्पणामुळे राजीव गांधी सागरी सेतू (सी लिंक) ते वरळी मरीन ड्राईव्ह दरम्‍यानचा प्रवास अवघा १० ते १२ मिनिटात होणार आहे."

- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री