'छावा' चित्रपटातील 'त्या' प्रसंगाला कात्री :राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ठाम निर्णय!
28-Jan-2025
Total Views |
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरवरून वादंग निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर २७ जानेवारीला भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राज ठाकरे यांचा सल्ला घेतल्यानंतर चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार असल्याचे दिग्दर्शक उतेकर यांनी स्पष्ट केले.
उत्तेकर यांनी अखेर एक पाऊल माघे घेऊन चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य हटवले जातील असे सांगितले. "ह्या दृश्यामागे कोणाच्या ही भावनांना ठेच पोचवण्याचा हेतु नव्हता, छत्रपती संभाजी महाराज काय होते, किती महान राजा होते, त्यांचा संघर्ष काय होता, हे संपूर्ण जगाला कळायला हवे. एक - दोन दृश्यांमुळे संपूर्ण चित्रपटाला गालबोट लागणार असेल तर आम्ही ते दृश्य नक्कीच हटवून टाकू" असे उतेकरांनी सांगितले.
"लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित हा चित्रपट बनवला असून आम्ही अधिकृत रित्या छावा कादंबरीचे हक्क खरेदी केले आहे. गेल्या ४ वर्षांपासून या चित्रपटावर बारकाईने काम करत आहोत. छावा कादंबरीत लिहल्याप्रमाणे संभाजी राजे होळीचा उत्सव साजरा करायचे. होळीच्या आगितून ते नारळ बाहेर काढायचे. चित्रपटात आम्ही लेझिम खेळताना दाखवले आहे कारण तो आपला पारंपरिक खेळ आहे. आपल्याला लाज वाटेल असे कोणतेही दृश नाही तरीही शिवप्रेमींच्या भावना दुखावणार असतील, तर लेझीम नृत्याचा प्रसंग हा महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे, हा प्रसंग आम्ही निश्चितच वगळणार आहोत, असे उतेकर यांनी सांगितले.
तसेच राज ठाकरे यांचे वाचन अफाट असून त्यांना इतिहास चांगला माहीत आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन सल्ला घ्यायचे ठरवले. त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन करून मौल्यवान सूचनाही केल्याचे उतेकर म्हणाले. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाआधी इतिहासतज्ज्ञांनाही दाखविण्यात येणार असल्याचे उतेकरांनी सांगितले.