‘इफ्फी’च्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मराठी चित्रपट महोत्सव’
मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी आयोजित करणार
28-Jan-2025
Total Views |
मुंबई : (Marathi Film Festival) मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासनातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी केली. या चित्रपट महोत्सवाचे स्वरुप ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’इतके (इफ्फी) दिमाखदार असणार आहे.
गेल्या ६० वर्षांपासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात नाही. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखांपासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. मात्र, शासनाचा अधिकृत असा महोत्सव नसल्याने यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुहूर्त स्वरूप आले आहे.
मुंबईला पहिला मान
यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून, तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल, जी थेट दर्शकांशी संवाद साधेल. या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा आणि नियमनियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.