जेएनपीटीने ७६वा प्रजासत्ताक दिन केला साजरा

नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या सीआयएसएफ जवानांचा सन्मान

    28-Jan-2025
Total Views |


JNPT


मुंबई, दि.२८ : विशेष प्रतिनिधी 
भारतातील सर्वोत्तम बंदर जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण येथे ७६वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला गेला. या कार्यक्रमाला जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या आगमनानंतर त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करत या राष्ट्रीय उत्सवाची सुरुवात झाली. मुख्य अतिथींना यानंतर संचलनाची पाहणी केली, त्यातून सीआयएसएफ जेएनपीए युनिटच्या शिस्तबद्धता आणि निष्ठेचे दर्शन घडले.

जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात सांगितले की, “या प्रजासत्ताक दिनी, आपण आपल्या लोकशाही मूल्यांचे सामर्थ्य, एकता आणि सेवेच्या अथक भावनेचा उत्सव साजरा करत आहोत. आपल्या प्रगतीवर दृष्टी टाकण्याचा हा क्षण आहे आणि जेएनपीएमध्ये आपण जागतिक स्तरावर भारताच्या वाढीसाठी योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहोत. अलीकडेच, मा.बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या पायाभूत सुविधा आणि क्षमता आणखी मजबूत करून जेएनपीए येथे अनेक परिवर्तनकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले.जनेप प्राधिकरण परिसरात आंतरराष्ट्रीय मानकांसह नवीन शाळेची स्थापना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही शाळा भविष्यासाठी शिक्षणाचा दीपस्तंभ म्हणून काम करेल, जी पुढच्या पिढीसाठी एक चांगले भविष्य घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब असेल.”
सीआयएसएफ जवानांचा सन्मान
दि.१८डिसेंबर २०२४ रोजी दुर्घटनाग्रस्त बोटीवरील प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या जनेप प्राधिकरण आणि सीआयएसएफच्या नऊ कर्मचाऱ्यांचा, त्यांचे शौर्य आणि निःस्वार्थता अधोरेखित करून सत्कार करण्यात आला.