दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार

    28-Jan-2025
Total Views |

DINESH WAGHMARE
 
मुंबई : (Dinesh Waghmare) राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले.
 
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना दि. २० जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते.
 
१९९४ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले दिनेश वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशीम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते. विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव; तसेच नवी मुंबई व पिंपरी- चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.
 
वाघमारे यांना स्कॉच अवॉर्ड, नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड, सीएसआर इंडिया २०२१ अवॉर्ड, पीएसयू अवॉर्ड फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर अवॉर्ड २०२१, सत्यन मित्रा नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.